शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टी असताना येळ्ळूर येथील राजहंस गडावर जाता येणार नाही. होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी हा आदेश काढला आहे.यामुळे आता सुट्टीच्या दिवशी गडावरची सहल काढता येणार नाही.
प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टी असताना राजहंस गडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी होत असते. यामुळे गर्दी वाढून गड परिसर तसेच परिसरातील गावच्या नागरिकांना कोरोना चा धोका होऊ शकतो असा निष्कर्ष निघाला असून त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे.
बेळगाव आणि परिसर नव्हेच तर पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिक गडावर गर्दी करतात. छत्रपती शिवरायांचे एक जागृत प्रेरणास्थान म्हणून या गडाची ओळख आहे. यामुळे सहकुटुंब गडावर जाऊन शिवकालीन वातावरणाचा आनंद अनेकजण लुटत असतात, मात्र आता काही नियम पाळावे लागत आहेत.
मध्यंतरी गडावर पुतळा उभारण्याची अफवा पसरल्यानंतर शिवोप्रेमी तरुणांनी जागता पहारा ठेऊन गड परिसराचे संरक्षण सुरू ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिव पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.