निवासी योजनेला आमचा विरोध असून न्यायालयाचा स्थगिती आदेश असलेली आमच्या मालकीची 25 एकर शेतजमीन सोडून बुडाने उर्वरित जमिनीवर आपली निवासी योजना राबवावी, अशी मागणी संबंधित जमीन मालक शेतकऱ्यांनी बुडा आयुक्तांकडे केली आहे.
रयत संघटनेचे कणबर्गी विभाग अध्यक्ष बबन मालाई, शेतकरी नेते राजू मरवे व प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी बुडाचे नूतन आयुक्त दिनेशकुमार यांना सादर करण्यात आले.
बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाकडून कणबर्गी येथे निवासी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 2006 -07 मध्ये जमीन आरक्षित करण्यात आली. मात्र योजनेची अंमलबजावणी वेळेत झाली नाही. त्यानंतर 25 एकर शेत जमिनीतील मालक न्यायालयात गेल्याने संपूर्ण योजनेला स्थगिती मिळाली.
मात्र आता लवकरच बुडाची योजना कार्यान्वित केली जाणार आहे. तेंव्हा ज्या 25 एकर जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्या जमिनी वगळून बुडाने उर्वरित जमिनीवर आपली योजना राबवावी, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी बबन मालाई यांच्यासह राजू मरवे, प्रकाश नाईक, भवानी मालाई, रामा दस्का, सिद्राय दस्का, नारायण अष्टेकर, मनोहर मालाई, महादेव मालाई, इराप्पा अष्टेकर, अल्ताफ शेख आदी शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, हे सर्व शेतकरी निवेदन देण्यासाठी आज सकाळी आपल्या कुटुंबासमवेत बैलगाड्या घेऊन मोर्चाने बुडा कार्यालयावर जाणार होते.
मात्र कणबर्गी येथे पोलिसांनी त्यांना अडवून बैलगाडीतून जाण्यास आक्षेप घेतला. तसेच बैलगाड्या घेऊन गेलात तर तुम्हाला अटक केली जाईल, अशी दमदाटीही केली. पोलिसांच्या या कृतीचा संबंधित शेतकऱ्यांनी निषेध करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.