बेळगाव शहरातून वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांना उपलब्ध झालेल्या विमान सेवेचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत .याचा अनुभव प्रवाशांच्या वाढत्या संख्येवरून घेता येऊ लागला आहे.
बेळगाव ते दिल्ली विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बेळगाव विमानतळाकडून मिळाली आहे. दररोज येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली असून बेळगाव दिल्ली विमानसेवा उत्तम प्रतिसादामुळे चांगली पद्धतीने सुरू असल्याची माहिती मिळाली.
13 ऑगस्ट रोजी 131 प्रवासी दिल्लीहून बेळगावला आले होते आणि परतीच्या प्रवासात 147 प्रवासी दिल्लीला गेले. 16 ऑगस्ट रोजी येताना प्रवाशांची संख्या 97 इतकी होती जाताना मात्र 132 प्रवाशांनी दिल्लीचा प्रवास केला.
आज 20 ऑगस्ट रोजी 145 प्रवासी दिल्लीहून बेळगावला आले असून जाताना 145 प्रवाशांनी बेळगाव ते दिल्ली असा प्रवास केला आहे. त्यामुळे या विमानसेवाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती हाती आली आहे. आठवड्यातून दोन वेळा बेळगावहुन दिल्लीला विमानसेवा आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करून देशाच्या राजधानीत जाणारे बेळगावकर विमानाने प्रवास करत असून ही संख्या वाढत चालली आहे.
सुरक्षित प्रवास, कमी वेळेत अंतर कापता येत असल्यामुळे विमानाचा वापर अनेक जण करत आहेत. इतर मार्गाने जाण्यासाठी अनेक ठिकाणी तपासणी नाक्यांना तोंड द्यावे लागते. वेळ जास्त लागतो तसेच वाढत्या रस्ते अपघातांनी सुरक्षितताही कमी झाली आहे. यापेक्षा थेट विमानाने जाऊन आपले काम उरकून परतणे हा मार्ग बेळगावकर स्वीकारत आहेत.