कॅम्प येथील 3 वर्षाच्या अजान बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचे थेट एन्काऊंटरच केले जावे, अशी मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन या संघटनेसह विविध संघटनांनी केली आहे.
शहरातील कॅम्प येथील अवघ्या 3 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेबद्दल शहर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन (एनएफआयडब्ल्यू) या संघटनेसह अन्य कांही संघटनांनी आज बुधवारी सकाळी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांना निवेदन सादर केले. तसेच अत्याचार करणाऱ्या नराधमाचे एन्काऊंटर करण्याची मागणी देखील केली. निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना राहुल ब्रिगेडियर महिला शाखेच्या अध्यक्षा रुखसाना नासिर खेडेकर यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोपीला कठोर शिक्षा वगैरे न करता थेट एन्काऊंटर करावे. जेणेकरून समाजात जरब निर्माण होऊन वाईट प्रवृत्तींना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
एनएफआयडब्ल्यू संघटनेच्या राज्य सचिव प्रमोदा हजारे म्हणाल्या की, सदर घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो त्याचप्रमाणे पोलिस प्रशासनाचे देखील अभिनंदन कारण की त्यांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पॉक्सो कायद्याखाली अटक केली आहे. मात्र आता सर्वात महत्वाचे म्हणजे पीडित बालिका आणि तिच्या आईला समुपदेशनाची गरज आहे.
ज्यामुळे त्या पोलिस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करतील आणि आरोपी फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचेल. पोलीस प्रशासन आणि महिला व बालकल्याण खात्याने या दोघांची काळजी घेऊन त्यांना सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी त्यांना नैतिक धैर्य दिले पाहिजे असे सांगून संबंधित नराधमास कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे हजारे म्हणाल्या.
दरम्यान, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सदर लैंगिक अत्याचार प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचे स्पष्ट केले. यासाठी खडेबाजारचे एसीपी चंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वैद्यकीय तपासणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान अत्याचाराच्या या घटनेची तीव्र पडसाद शहरात उमटले असून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता शहरात बालिकाही असुरक्षित आहेत का? असा सवाल केला जात आहे. त्याचप्रमाणे संबंधित आरोपीला लवकरात लवकर कठोर शासन करावे, अशी मागणीही केली जात आहे.