अमावस्येनिमित्त हुंडाई वेरना गाडीची पूजा केल्यानंतर स्टार्टर मारताच नियंत्रण सुटून सुसाट वेगाने नवी कोरी कारगाडी कांही अंतरावर असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन धडकल्याची घटना आज सकाळी जुने बेळगाव येथे घडली.
सुदैवाने या अपघातात कोणाला इजा झाली नाही. तथापि गाडीच्या दर्शनीय भागाचे मात्र मोठे नुकसान झाले.
आज दर्श अमावस्येनिमित्त सर्वत्र वाहने आणि यंत्रांची पूजा केली जात आहे. त्यानुसार आज सकाळी जुने बेळगाव येथे खासबागकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी नव्या हुंडाई वेरना या कार गाडीची (केए 29 एम 6989) पूजा करण्यात आली. गाडीला हार वगैरे घालून गाडी लिंबा वरून नेण्यासाठी चालकाने स्टार्टर मारताच गाडी अचानक सुसाट वेगाने पुढे झेपावली आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात थेट समोर रस्त्याकडेला असलेला विजेच्या खांबाला जाऊन धडकली. हा प्रकार इतका आकस्मिक घडला की कोणाला काही कळायच्या आत गाडी खांबावर आदळून तिच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.
शहापूर, जुने बेळगाव, खासबाग आदी उपनगरातील महिला सकाळच्या वेळी घरासमोर सडामार्जन करून रांगोळी घालत असतात. उपरोक्त घटना घडली त्यावेळी सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती आणि घरासमोर महिला रांगोळी काढण्यास बसल्या नव्हत्या. अन्यथा नियंत्रण सुटून सुसाट वेगाने झेपावणाऱ्या कारगाडीमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
आपल्या वाहनाने आपल्याला सुरक्षितपणे साथ द्यावी यासाठी अमावस्या निमित्त वाहन चालक वाहनांची पूजा करतात. मात्र उपरोक्त प्रकार पाहता अपघातग्रस्त हुंडाई कारगाडी मालकाला आजची अमावस्याची पूजा मोठी महागात पडल्याचे बोलले जात होते.