शहर स्वच्छतेबाबत महापालिकेमध्ये काल सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये शहरातील कचऱ्याची उचल आता दिवसातून दोन वेळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना कामात सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर आधी नोटीस मग थेट कारवाई केली जाणार आहे.
शहर स्वच्छतेसंदर्भात बेळगाव महापालिकेमध्ये काल सोमवारी प्रभारी आयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आणि पर्यावरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. आरोग्य निरीक्षक, पर्यवेक्षक व महिलांसह सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत शहर स्वच्छतेबाबत चर्चा करताना कोरोना प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीच्या काळात सफाई कामगारांनी चांगले काम केले असले तरी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आणखी चांगले काम अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. शहरातील 47 प्रभागांमधील कचऱ्याची उचल नऊ ठेकेदारांकडून केली जात आहे, तर उर्वरित 11 प्रभागांची स्वच्छता महापालिकेचे सफाई कामगार करतात.
तथापि सर्व 58 प्रभागात स्वच्छतेचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार आहे. प्रत्येक घरासमोर घंटा गाडी गेली पाहिजे. ओला व सुका कचरा वेगळा जमा झाला पाहिजे. तथापि तसे होत नाही. शिवाय नियमित व कंत्राटी सफाई कामगारही पूर्णवेळ काम करीत नसल्याची तक्रार आहे.
सफाई कामगारांनी पूर्णवेळ काम केले पाहिजे अन्यथा पर्यवेक्षक व आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी आयुक्त लक्ष्मी निपाणीकर यांनी यावेळी दिला. सफाई कामगारांचे काम व शहर स्वच्छतेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षक, पर्यवेक्षक व मुकादम यांची असल्यामुळे त्यांनी आपले काम योग्य पद्धतीने केले नाही तर कारवाई हाच पर्याय असल्याचे डॉ. संजय डुमगोळ यांनी स्पष्ट केले.