शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर पंधरा दिवसात शिक्षक भरती करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला होता. त्याची दखल घेत गरबेनहट्टी, नदंगड व इतर गावातील शाळांमध्ये डेप्युटेशनवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
खानापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर दरवर्षी अतिथि शिक्षकांची नेमणुक करून वेळ मारून नेण्यात येत होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असल्याने त्या शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे कांही शाळांमध्ये मराठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन अभ्यासक्रम कशाप्रकारे देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर खानापूर तालुका युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळांना भेट देऊन येथील विद्यार्थ्यांची संवाद साधीत माहिती जाणून घेतली होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त कन्नड विषयाचा अभ्यास दिला जात आहे, अशी तक्रार केली होती. त्यानंतर तातडीने युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांना निवेदन दिले होते. तसेच पंधरा दिवसाच्या शिक्षक भरती न केल्यास शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या शिक्षण खात्याने शिक्षक नसलेल्या शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक भरती करताना डेप्युटेशनवर शिक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र डेप्युटेशनवर नेमणुक करण्यात आली असली तरी एकाच शिक्षकावर दोन शाळांचा भार येणार असल्याने शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक भरती करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, खानापूर तालुक्यातील कांही शाळांमध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी किंवा शिक्षण खात्याचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
परिणामी तालुक्यातील शाळांमधील दीडशेहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी या जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या कांही शाळांमध्ये डेप्युटेशनवर शिक्षक नेमण्यात आले असले तरी कायमस्वरूपी शिक्षक भरती होईपर्यंत यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला जाईल, असा इशारा खानापूर तालुका युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.