रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावर हिरेबागेवाडी टोलनाका येथे अडकून पडलेल्या अवजड वाहनांच्या चालक आणि क्लिनर अशा सुमारे 600 जणांच्या भोजन व्यवस्थेसाठी सुमारे 10 हजार रुपये किंमतीचे जीवनावश्यक साहित्य आणि भाजीपाला उपलब्ध करून दिल्यामुळे बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, हुबळी -धारवाडकडून बेळगावकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या गुरुवारी पुराचे पाणी आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हिरेबागेवाडी (ता. बैलहोंगल) येथील टोल नाक्याच्या ठिकाणी महामार्गावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यात आली होती. मुसळधार पावसासह पूर परिस्थितीमुळे गुरुवारी दिवसभर असंख्य वाहने रोखण्यात आल्यामुळे या ठिकाणी ट्रक, टँकर आदी अवजड वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पुरामुळे अडकून पडल्यामुळे या वाहनांचे चालक क्लिनर आणि कामगार अशा सर्वांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात हिरेबागेवाडी बैलहोंगल असे डीएसपी शिवानंद कटगी यांनी काल शुक्रवारी सकाळी बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधून कांही मदत होत असेल तर करावी, अशी विनंती केली.
त्यांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ हालचाल करताना संतोष दरेकर यांनी आपले सहकारी किरण निप्पाणीकर, व्हिक्टर फ्रान्सिस, सुरज अणवेकर, राजू काकती, मनोज मत्तिकोप व प्रसन्ना घोडके यांच्या मदतीने जवळपास 10 हजार रुपये किंमतीचे जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला आणि स्वयंपाकाला लागणारे अन्य साहित्य काल दुपारी भरपावसात हिरेबागेवाडी येथे जाऊन पोहोच केले.
या मदत कार्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलला बेळगावचे डीसीपी डाॅ. विक्रम आमटे यांचे सहकार्य लाभले. मदत कार्य असल्यामुळे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वाहनाला हिरेबागेवाडी टोल नाक्याच्या ठिकाणी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. हिरेबागेवाडी आउट पोस्टच्या ठिकाणी संतोष दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोबत आणलेले जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला आदी कित्तुरचे पीएसआय देवराज उळ्ळागड्डी यांच्याकडे सुपूर्द केले.
त्यानंतर रामपुरी वीर सोमेश्वर कल्याण मंडप येथे हुबळीच्या मलानाड धाब्याच्या कर्मचाऱ्यांनी अडकून पडलेल्या अवजड वाहनांच्या सुमारे 600 चालक, क्लिनर आणि कामगारांसाठी काल रात्री जेवणाची व्यवस्था केली. सदर कार्याबद्दल फेसबूक फ्रेंड्स सर्कलची सर्वत्र प्रशंसा होत आहे.