गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या गोवावेस पिरनवाडी रस्ता रुंदीकरणात असलेले तीन नाल्यांचा एकच नाला केल्याने दर वर्षी पिरनवाडीच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचत आहे त्यामुळे या भागांत घरातून पाणी शिरत आहे याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे असा आरोप पिरनवाडी ग्रामस्थांतून केला जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदारपणामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप सचीन राऊत यांच्यासह पिरनवाडी ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नाले असून देखील गेल्या 25 -30 वर्षात पिरनवाडी परिसरात पूर परिस्थिती निर्माण होत नव्हती. या भागात पिरनवाडी येथील नाल्यासह ब्रह्मनगर, मजगाव क्रॉस आणि बेम्कॉ क्रॉस या ठिकाणी नाले होते. मात्र अलीकडे तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने पिरनवाडी वगळता अन्य तीन नाल्यांच्या ठिकाणी ब्रिज बांधावे लागू नयेत म्हणून ते नाले बुजवून टाकताना त्यांचे पात्र पिरनवाडी नाल्याला जोडले आहे.
परिणामी गेल्या 3 वर्षापासून पिरनवाडी परिसराला पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदार पणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही बुजवलेले नाले खुले करून संबंधित ठिकाणी ब्रिज बांधण्याद्वारे झालेली चूक सुधारता येऊ शकते. तरी प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी पिरनवाडी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी पात्राबाहेर येऊन पिरनवाडी परिसर जलमय झाला आहे. याठिकाणच्या मारुतीनगर व महावीरनगरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे महामार्गावर पाणी आल्यामुळे शुक्रवारी दुपारी पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.
मुसळधार पावसामुळे अन्य नदी-नाल्यांप्रमाणे आल्याप्रमाणे पिरनवाडी येथील नाल्याला देखील पूर आला असून पुराचे पाणी पिरनवाडीत घुसले आहे. गेल्या तीन वर्षापासून पिरनवाडी परिसरात ही परिस्थिती निर्माण होत आहे. यंदा प्रामुख्याने या ठिकाणच्या मारुतीनगर व महावीरनगर येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडवून त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचा बेळगाव -गोवा राज्य महामार्ग लक्ष्मी मंगल कार्यालयनजीक पाण्याखाली गेला आहे. परिणामी आज सकाळपासून महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद झाली आहे. फक्त एका बाजूची वाहतूक सकाळपासून सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
बेळगाव ग्रामीण आणि उद्यमबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आज सकाळपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौज फाटा वाहतुकीची कोंडी सोडविण्याचा आटापिटा करताना दिसत होते. वाहतूक कोंडीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.