गुटखा कारखान्यासंदर्भात 40 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सदलगा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांसह दोघा पोलिस हवालदारांना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले.
सदलगा पोलिस ठाण्यामध्ये दहा दिवसांपूर्वीच उपनिरीक्षक म्हणून चार्ज घेतलेले कुमार हित्तलमणी, हवालदार श्रीशैलम मंगी आणि मायाप्पा गड्डी अशी लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकलेल्यांची नांवे आहेत. इचलकरंजी येथील रहिवासी असलेले राजू पाच्छापूरे नामक व्यक्तीकडून पोलीस उपनिरीक्षक कुमार हित्तलमणी श्रीशैलम मंगी व मायाप्पा गड्डी यांनी गुटखा कारखान्यासंदर्भात 40 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत राजू पाच्छापूरे यांनी आठ दिवसापूर्वी जिल्हा लाचलुचपत विभागात माहिती देऊन फिर्याद दाखल केली होती.
या फिर्यादीची दखल घेत जिल्हा लाचलुचपत अधीक्षक बी एस न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जी. एम. करूनाकरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक एच. सूनिलकुमार,ए. एस. गुदीगोप, धारवाडचे अली शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक कुमार हित्तलमणी यांच्यासह श्रीशैलम मंगी व मायाप्पा गड्डी यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर कारवाई प्रसंगी पोलिस उपअधीक्षक मनोज कुमार नायक, पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.