बेनकनहळ्ळी (ता बेळगाव) गावच्या गायरानावर नवा सरकारी कचरा डेपो प्रकल्प राबविण्यास बेनकनहळ्ळीसह कल्लेहोळ आणि सुळगा गावच्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून आज त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेनकनहळ्ळी येथील कचरा डेपोच्या विरोधातील निवेदन सादर करण्यासाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बेनकनहळ्ळीसह कल्लेहोळ आणि सुळगा गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. बेळगाव शहर आणि परिसरातील कचऱ्याचा संग्रह करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चिरमुरी येथील कचरा डेपो अपुरा पडत असल्यामुळे बेनकनहळ्ळी गावानजीकच्या गायरानावर नवा कचरा डेपो उभारला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 5 जून रोजी आदेश जारी केला आहे. तथापि या कचरा डेपोला बेनकनहळ्ळी गावासह कल्लेहोळ व सुळगा या गावांमधील तसेच परिसरातील अन्य गावांमधील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. कारण या कचरा डेपोमुळे परिसरातील संपूर्ण वातावरण दूषित होणार आहे.
सदर डेपोच्या जागे नजीकच आश्रयनगर ही सुमारे हजार-बाराशे लोकवस्तीची वसाहत आहे. त्याचप्रमाणे कचरा डेपोलगत एफसीआय सरकारी गोदामात आहे, शिवाय जवळूनच बेळगाव -राकसकोप हा रस्ता जातो. त्यामुळे हा कचरा डेपो सुरू झाल्यास नजीकच्या लोक वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर सदर कचरा डेपो एफसीआय गोदामा लगतच उभारण्यात येणार असल्यामुळे गोदामामधील अन्नधान्यावर दुष्परिणाम होऊ शकतो आणि या दुष्परिणामांचे पडसाद बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी बेनकनहळ्ळी गायरानावर हा नवा कचरा डेपो उभारण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेनकनहळ्ळीच्या संतोष रमेश मंडलिक यांनी नियोजित कचरा डेपोमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. सध्या चिरमुरी येथील कचरा डेपोमुळे तेथील परिसराचे काय झाले आहे हे आपण पाहात आहोत.
त्या कचरा डेपोमुळे तेथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तसा त्रास बेनकनहळ्ळीसह कल्लेहोळ आणि सुळगा तसेच आजूबाजूच्या सर्व लोकांना होऊ शकतो. यासाठी नियोजित कचरा डेपोला आमचा विरोध असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.