कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने प्रवास नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार कोणत्याही परराज्यातून हवाई अथवा रस्ते मार्गाने कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे 72 तासांपेक्षा जुने नसलेले आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र अथवा कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. हा नियम महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व विमानांसाठी देखील लागू असेल.
महाराष्ट्राच्याबाबतीत कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेतलेल्याला किमान 15 दिवस झाले असले पाहिजेत, जेणेकरून कोविन पोर्टलकडून मिळणाऱ्या अंतिम लसीकरण प्रमाणपत्रासाठी ते पात्र असतील.
या तऱ्हेने लसीकरणाच्या दोन्ही डोसांची पात्रता पूर्ण करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रातील प्रवेशासाठी आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राच्या सक्तीतून वगळले जाईल. जर प्रवाशाने कोरोना प्रतिबंधक लसीचा फक्त एकच डोस घेतला असेल तर त्यांच्यासाठी 72 तासापेक्षा जुने नसलेले आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.
गोवा राज्यात प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांच्यात आजाराची लक्षणे नसावीत आणि त्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्णत: झालेले असावे व त्याला गोव्यात प्रवेश करताना किमान 14 दिवस झालेले असले पाहिजेत, अशा प्रवाशांना आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्रा शिवाय गोव्यात प्रवेश दिला जाईल.
तथापी ही अट फक्त गोव्यात जाऊन काम करणाऱ्यांसाठी मर्यादित असणार आहे. इतर कारणांसाठी गोव्यात जाणाऱ्यांसाठी मात्र 48 तासापेक्षा जुने नसलेले आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.