भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ होते. प्रारंभी डॉ. व्ही. डी. डांगी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राला 2021 -22 सालासाठी सरकारकडून अनुदान मिळविण्याबाबतचा प्रस्ताव, केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी वाढविणे, केंद्रातील रिक्त झालेली पदे भरणे, केंद्राला आवश्यक यंत्रोपकरण खरेदी, सरकारच्या विविध खात्यांकडून विकलांगांसाठी मिळणारे अनुदाने आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे येत्या 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध शाळेमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मुकबधिर यांच्या शिबिराबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहरासह ग्रामीण भागात बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्रातर्फे आयोजित केली जाणारी शिबिरे आणि आरोग्य तपासणी उपक्रमासाठी वाहनांची सोय करण्याबाबतच्या चर्चेप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी आपण स्वतः वाहने उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
बैठकीस जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. बी. मुन्याळ, भारतीय रेड क्रॉस संघटना बेळगाव जिल्हा अध्यक्ष अशोक बदामी, महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी, नामदेव बिलकर, जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक, गजानन मण्णीकेरी, माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचे अध्यक्ष विकास कलघटगी, गजानन साबण्णावर आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.