बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात एका तीन वर्षाच्या मुलीवर दोन नराधमांनी दुष्कृत्य केले आहे ही बाब मानवतेला कलंक फासणारी असून या नराधमांना कडक शिक्षा देण्याची मागणी जायंट्स सखी या महिला आणि मुलींसाठी कार्यरत असणाऱ्या संघटनेने केली आहे.यासंदर्भात जायंट्स सखीने पोलिस कमिशनर आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
डीसीपी विक्रम आमटे यांनी निवेदनाचा स्वीकार करून आरोपींना कडक शिक्षा करू असे सांगून आपल्या सारख्या सामाजिक संघटनांनी अशा घटना घडू नयेत म्हणून जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली.
ही घटना म्हणजे मानवतेला काळिमा फासणारी असून जगात श्रेष्ठ असणाऱ्या भारतीय संस्कृतीला मान खाली झुकवायला लावणारी असून आमची संघटना या कृत्याचा जाहीर निषेध करते असे अध्यक्षा नीता पाटील यांनी सांगितले.
फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर यांनी ही घटना म्हणजे अत्यंत चिंताजनक बाब असून वकील वर्गाने आरोपींचे वकालत पत्र घेऊ नये अशी विनंती बेळगाव बार असोसिएशनकडे केली आहे.
निवेदन देतेवेळी अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, विद्या सरनोबत, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर, अर्चना पाटील,शितल नेसरीकर,ज्योती पवार, दीपा मुतगेकर, भाग्यश्री पवार उपस्थित होत्या.