Friday, April 26, 2024

/

…अन् ‘त्या’युवकांना भरावा लागला दंड!

 belgaum

शहरातील रामतीर्थनगर येथील कचरा नेऊन महानगरपालिकेसमोर टाकणाऱ्या त्या चार युवकांनी माफी मागितल्यामुळे महापालिकेने आज शनिवारी कायद्यानुसार त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस गाजत असलेल्या या प्रकारावर पडदा पडला आहे.

रामतीर्थनगर येथील कचऱ्याची उचल होत नसल्याचा आरोप करून गेल्या गुरुवारी शहरातील चार संतप्त युवकांनी आंदोलनाचा भाग म्हणून बेळगाव महानगरपालिकेसमोर कचरा नेऊन टाकला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या आणि पालिकेसमोर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी महापालिकेच्या कर्मचारी संघटनेने काल जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यावर आज बेळगाव महापालिकेच्यावतीने संबंधित युवकांवर कारवाई करण्यात आली आहे.

त्या युवकांनी स्वतःहून माफी मागितल्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेसमोर कचरा टाकणे हा बेळगाव शहराचा अपमान आहे, अशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची भावना झाली होती. त्यामुळे महापालिकेसमोर कचरा टाकण्याच्या कृतीचा निषेध करून त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. मात्र आता संबंधित युवकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्यामुळे या प्रकारावर पडदा पडला आहे.Garbage corporation

 belgaum

कोणतेही आंदोलन लोकशाहीचे भान ठेवून, राज्य घटनेला अनुसरून कायद्याची पायमल्ली न करता करणे गरजेचे असते. मात्र या सर्व गोष्टी पायदळी तुडवून संबंधित युवकांनी महापालिकेसमोर कचरा टाकण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान, बेळगाव महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी वैद्यकीय आणि घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे हा गुन्हा आहे. या कायद्यानुसार संबंधित युवकांना प्रत्येकी 500 रुपये दंड करण्यात आले असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेकडून शहरातील कचऱ्याची वेळच्या वेळी उचल केली जाईल. तथापि नागरिकांनी आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने करू नये, असेही त्यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.