बेळगाव शहरातील रामतीर्थनगर येथून कचरा आणून बेळगाव महापालिकेसमोर टाकणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी बेळगाव महानगरपालिका नोकर क्षेत्राभिवृद्धी संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव महानगरपालिका नोकर क्षेत्राभिवृद्धी संघाचे अध्यक्ष मलिक गुंडप्पनावर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. काल गुरुवारी कांही जणांकडून रामतीर्थनगर येथून कचरा आणून बेळगाव महानगरपालिके समोरील तिरंगा ध्वजासमोर फेकण्यात आला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ सुरू आहे.
तेंव्हा कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. महत्त्वाचे म्हणजे रामतीर्थनगर परिसर स्वच्छतेची जबाबदारी बुडावर आहे. तो परिसर अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही. त्यामुळे घडलेला प्रकार अत्यंत गैर असून यामुळे महापालिकेची निष्कारण बदनामी झाली आहे. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस काम करतात. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असताना त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याखेरीज सरकारी कार्यालयासमोर कचरा टाकणे हा केएमसी कायद्याच्या कलम 441 अन्वये गुन्हा आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेसमोर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी बेळगाव महानगरपालिका नोकर क्षेत्राभिवृद्धी संघाचे अध्यक्ष गुंडप्पनावर यांच्यासह उपाध्यक्ष भरत तळवार, सरचिटणीस गणपती भट, महांतेश नाईक, रवी पुणेकर, नागेश कलंत्री, चंदू मुरारी, विशाल उच्चूकर, परशुराम कांबळे, यल्लाप्पा शिराळे आदी उपस्थित होते.