अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचा जणू सुतोवाच केला आहे. पक्षश्रेष्ठी जी सूचना करतील त्याप्रमाणे यापुढे आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा माझ्यावर स्नेह आणि विश्वास आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या कोणालाही उच्च पद दिले जात नाही. तथापि पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवताना आज वयाच्या 79 व्या वर्षी मला सलग दोन वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी दिली आहे. आगामी दिवसांमध्ये पक्षसंघटना बळकट करून पुन्हा भाजपला सत्तेवर आणणे हा माझा संकल्प आहे, असे येडियुरप्पा म्हणाले.
राष्ट्रीय नेते येत्या 25 तारखेला ज्या सूचना देणार आहेत. त्यानंतर 26 तारखेला मी माझे काम सुरू करणार आहे येत्या 26 तारखेला गेल्या दोन वर्षात आम्ही जे साध्य केले आहे त्यासंदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जी सूचना करतील त्यानुसार मी कार्याला सुरुवात करेन. पक्षाला अधिक बळकट करून पुन्हा सत्तेवर आणणे हे माझे कर्तव्य आहे. यासाठी राज्यातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी माझ्या सोबत राहून सहकार्य करावे. त्याचप्रमाणे माझ्यासाठी चळवळ, आंदोलने केली जात आहेत ते योग्य नाही, त्याऐवजी सर्वांनी मला सहकार्य करावे.
सर्व मठाधीशांनी येऊन मला आशीर्वाद देऊन संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. असा पाठिंबा इतर कोणालाही मिळालेला नाही. माझ्यासाठी हे अविस्मरणीय आहे. आता मठाधीशांसह सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या पुढील कार्यासाठी मला सहकार्य करावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शेवटी केले.