मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपण आपल्या पदावरून पायउतार होत आहोत हे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केलेले असताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांनी मात्र कर्नाटकातील नेतृत्व बदलावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
नवी दिल्ली येथे पत्रकारांनी कर्नाटकातील नेतृत्व बदलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘माझा सर्वांना नमस्कार. आपण सर्वजण एक दिवस एकत्र बसून चर्चा करूया, चहापान देखील करूया,’ असे अरुण सिंग म्हणाले. बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात यावे ही असंतुष्ट आमदारांची मागणी जोर धरू लागल्याने गेल्या जून महिन्यात अरुण सिंग यांनी कर्नाटकला भेट देऊन पक्षाचे नेते मंत्री आणि आमदारांशी चर्चा केली होती. नेतृत्व बदलाबाबत उत्तर देणे टाळताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वखाली कर्नाटक सरकार उत्तम कामगिरी बजावत आहे अशा शब्दात येडियुरप्पा यांची त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रशंसा केली. आमचे सर्व पक्ष कार्यकर्ते, मंत्री आणि आमदार संघटित आहेत. त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही अरुण सिंग यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कर्नाटकात नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. खुद्द बी. एस. येडियुरप्पा यांनी येत्या 25 जुलै रोजी हायकमांड जी सूचना देईल त्याप्रमाणे आपण वागणार असल्याचे सांगून गुरुवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत सूतोवाच केला आहे. आपण पक्षातील विश्वासू मंडळींपैकी एक असल्याचे सांगून त्यामुळेच वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर देखील कर्नाटकचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली असल्याचेही येडियुरप्पा यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत ‘हे’ चौघे
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी हायकमांडचा निर्णय आपण माणणार असून राजीनामा देण्यास तयार असल्याचा सूतोवाच केल्यानंतर आता कर्नाटकाचा भावी मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात चार नांवे प्रामुख्याने पुढे येत आहेत. प्रल्हाद जोशी, अरविंद बल्लद, बी. एस. संतोष आणि मुरुगेश निराणी ही चार नांवे चर्चेतआहेत.
सदर चारही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. प्रल्हाद जोशी केंद्रात कर्नाटककडून एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार हे खाते त्यांच्याकडे आहे.
जोशी यांच्यासह आरएसएसचे संघटना महामंत्री बी. एस. संतोष, बागलकोटचे माजी मंत्री मुरुगेश निराणी आणि अरविंद बेल्लद यांची नांवे प्रामुख्याने मुख्यमंत्री पदासाठी चर्चिली जात आहेत.
याव्यतिरिक्त बेळगावच्या लक्ष्मण सवदी यांचे नांव देखील चर्चेत आहे.