मला मंत्रिपदाची ऑफर असल्याची जी बातमी पसरवली जात आहे ती साफ खोटी असून सरकारकडून मला मंत्रिपदाची कोणतीही ऑफर नाही, असा स्पष्ट खुलासा केएमएफचे चेअरमन भालचंद्र जारकीहोळी यांनी केला आहे.
शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना, कांही वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांमध्ये सरकारकडून मला मंत्रिपदाची ऑफर देण्यात आले असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहे. हे वृत्त संबंधितांनी कोणत्या आधारावर प्रसिद्ध केले मला माहित नाही, तथापि त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून मला सरकारकडून मंत्रिपदाची वगैरे कोणतीही ऑफर आलेली नाही. आम्ही सर्वजण आपापल्या कामात आहोत, मी माझे केएमएफचे काम करत आहे, असे भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.
आपले बंधू माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या संदर्भात बोलताना राजकारणात रुसवे-फुगवे असणारच त्याला फार महत्त्व देऊ नये. एकदा का रमेश गोकाकला आले की आम्ही सर्वजण एकत्रित बसून चर्चा करणार आहोत. त्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांसमोर कांही गोष्टी स्पष्ट करणार आहेत.
येत्या दोन दिवसात आम्ही त्या स्पष्ट करू. सध्या रमेश यांना पुनश्च मंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. कांही कायदेशीर अडचणी आहेत. त्या दूर झाल्या की रमेश यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल, असेही भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.