बेळगाव जिल्ह्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील तब्बल 3 लाख 22 हजार नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून सदर वयोगटातील लसीकरणात बेळगाव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.
राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वाधिक 24 लाख 36 हजार 500 जणांचे लसीकरण बेंगलोर शहरात झाले आहे. त्यापाठोपाठ म्हैसूर जिल्ह्यात 3 लाख 85 हजार 151 डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, या वयोगटातील लसीचा दुसरा डोस देण्याबाबत बेळगाव जिल्हा पिछाडीवर आहे.
जिल्ह्यात केवळ 922 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. म्हैसूर जिल्ह्यात 12 हजार 331 तर बेंगलोर शहरात 1 लाख 39 हजार 382 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यापासून कर्नाटकात लसीचे 2 कोटी 46 लाख 92 हजार डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वर्षे वयोगटात राज्यात 75 लाख 67 हजार जणांना पहिला डोस आणि 1 लाख 81 हजार 442 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्व गटात 13 लाख 25 हजार 191 डोस देण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणाचा वेग पुन्हा मंदावला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 42 हजार 638 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस तर 32 हजार 234 जणांना दुसरा डोस मिळाला. त्याचप्रमाणे 67 हजार 468 फ्रन्टलाइन वर्कर्सना लसीचा पहिला डोस, तर 14 हजार 515 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 पेक्षा जास्त वयोगटातील 6 लाख 73 हजार जणांना लसीचा पहिला डोस तर केवळ 1 लाख 62 हजार जणांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.
बेळगाव जिल्ह्यासाठी लसीच्या 38 लाखाहून अधिक डोसांची गरज आहे. परंतु मागणी इतका पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. जूनमध्ये प्रशासनाने एका दिवसात 1 लाखाहून अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली होती. त्यानंतर काही दिवस लस पुरवठा सुरळीत होता, मात्र आता पुन्हा लस टंचाई निर्माण झाली आहे.