बेळगाव तालुक्यातील बडस ते बेळवट्टी गावादरम्यानच्या पुलावरील रस्त्याला एका बाजूला भगदाड पडण्याबरोबरच रस्त्याला मोठी चर पडली आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव तालुक्यातील बडस आणि बेळवट्टी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल दिवसेंदिवस वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे. चार वर्षापूर्वी पाईप घालून हा पूल बांधण्यात आला आहे.
त्यानंतर गेल्या मे महिन्यात या पुलाची दुरुस्ती करून पुलाच्या कठड्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र अलीकडे या पुलावरील रस्त्यावर एका बाजूला मोठे धोकादायक भगदाड पडले असून रस्त्याला चर गेली आहे.
सदर पुलावरून बडस, बेळवट्टी, बाकनूर, गोल्याळी, बैलुर व मोरब या गावांकडे जाणाऱ्या वाहनांची सतत रहदारी असते. पुलावरून मोठ्या प्रमाणात होणारी वाहनांची रहदारी लक्षात घेता सध्या याठिकाणी पडलेले भगदाड आणि रस्त्याला पडलेली चर अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते. एखाद्या अवजड वाहनांमुळे पुलावरील सरीच्या ठिकाणी रस्ता खचून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या भागाच्या लोकप्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि रस्त्याला गेलेला तडा व भगदाड बुजवून पुलाची दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बडस ग्रा. पं. सदस्य कलाप्पा नारायण पाटील यांच्यासह समस्त गावकऱ्यांनी केली आहे.