सोमवार 26 जुलै रोजी मुख्यमंत्री पदाचा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होणार असल्याने हा दिवस मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासाठी भावनाविवश करणारा ठरणार आहे, आणि वाढते अनुमान हे आहे की याच दिवशी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वारसदार कोण? याबाबत ही उत्सुकता ताणली गेली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक नांवे चर्चेत असली तरी भाजप हायकमांड गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना येडियुरप्पा यांचे वारसदार म्हणून निवडण्याची शक्यता अधिक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान कर्नाटक सरकारच्या द्विवर्षपूर्ती निमित्त 26 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे सुपूर्द करण्याची सूचना भाजप हायकमांडने बी. एस. येडियुरप्पा यांना दिली आहे.
दरम्यान, येडियुरप्पा यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे वारसदार म्हणून कोणतेही नांव कर्नाटककडे पाठविण्यात आलेले नाही. परंतु संबंधित नांवाची घोषणा 26 जुलै रोजी सायंकाळी केली जाईल, असे नवी दिल्लीतील भाजप सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.