सोशल डिस्टंसिंगच्या नियमाला हरताळ. खरेदीसाठी पुन्हा उडाली झुंबड. रविवार सकाळचे हे दृश्य शनिवार प्रमाणेच पहायला मिळाले. राज्यात उद्या सोमवारपासून कडक लॉक डाऊन सुरू होणार असल्यामुळे काल शनिवारप्रमाणे आज रविवारी सकाळी अवघे बेळगावकर खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे बाजारपेठेत तोबा गर्दी झाली होती. मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्याबरोबरच खरेदी वेळी नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते.
कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने उद्या सोमवारपासून संपूर्ण राज्यात कडक लॉक डाऊन लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. लॉक डाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व साहित्याची जमवाजमव करण्याकरता आज रविवारी देखील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले होते. लॉक डाउन काळातही सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक सेवा व व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. तरीही शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्त्यांवर खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती.
खडेबाजार, नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ कांदा मार्केट, खडेबाजार शहापूर आदी भागातील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील मॉल्सच्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. किराणा साहित्य, भाजीपाला व इतर आवश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना कोरोनाच्या संकटाचे अजिबात भय नसल्याचे जाणवत होते. कोणत्याही भागामध्ये मास्क अथवा सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले.
नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात विविध ठिकाणी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून पोलिसांना देखील काय करावे हे सुचत नसल्याने ते हतबल झाले होते. लॉक डाऊनची घोषणा झाल्यापासून या पद्धतीने शहर परिसरात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असल्यामुळे आगामी काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी शहरवासीयांना लॉकडाउनच्या निमाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. लॉक डाउन काळात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडून आवश्यक साहित्याची खरेदी करावी. मात्र सकाळी दहानंतर आपत्कालीन परिस्थिती वगळता नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. सकाळी 10 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. विमान अथवा रेल्वेचे बुकिंग असलेल्यांना संबंधित कागदपत्रे सादर करून प्रवासाला जाता येईल. कोणत्याही परिस्थितीत सकाळी दहानंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.