कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली नियती फाउंडेशनतर्फे आज आमगाव (ता. खानापूर) खेड्यामधील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली नियती फाउंडेशनच्या पथकाने आज शुक्रवारी आमगाव (ता. खानापूर) या खेडेगावाला भेट दिली. सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या प्रतिकूल कालावधीत सदर गावातील जीवनावश्यक साहित्याचा तुटवडा लक्षात घेऊन नियती फाउंडेशनतर्फे ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
डोंगर माथ्यावर असणाऱ्या आमगावला जाण्यासाठी डॉ. सरनोबत यांच्यासह नियती फाऊंडेशनच्या सदस्यांना परिश्रम घ्यावे लागले.
रस्त्यावर आलेल्या नदीच्या पाण्यातून त्यांना जपून वाट काढावी लागली. पाण्याखाली गेलेला या ठिकाणचा अवघा एक -दिड फूट उंचीचा अरुंद ब्रिज पाहून नेमका कोणता तर्क लढवून हा ब्रिज बांधण्यात आला असावा, असा प्रश्न सर्वांना पडला होता.
डोंगर माथ्यावर असल्यामुळे आमगाव येथे शेती नाही. या ठिकाणचे लोक गोव्याला जाऊन हंगामी कामं करत असल्यामुळे गावातील बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. यासाठीच नियती फाउंडेशनने मोबाईल कनेक्टिव्हिटी नसलेल्या आमगावची जीवनावश्यक साहित्याच्या वाटपासाठी निवड केली.