बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या कोविड वॉर रूमला नूतन खासदार मंगला अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोविड वॉर रूमची हेल्पलाईन बंद असल्याचे पाहून त्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या
बेळगावच्या विश्वेश्वरय्या नगरात स्मार्टसिटीच्या कमांड सेंटरमध्ये कोविड वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन आणि उपचारांबाबत सहाय्य्य करणे हा त्यामागे हेतू आहे. शनिवारी खासदार मंगला अंगडी यांनी आमदार अनिल बेनके यांच्यासमवेत या वॉर रूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
या वॉर रूममधील हेल्पलाइनचा दूरध्वनी बंद पडला आहे. त्यामुळे लोकांना संपर्क साधून मदत मागणे कठीण होत आहे अशा तक्रारी करण्यात येत आहेत. त्यावर आ. बेनके यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
या भेटीवेळी बोलताना खा. मंगला अंगडी म्हणाल्या की, बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनसह पूरक माहिती लोकांना देण्यासाठी वॉर रूम आणि हेल्पलाईन सुरु करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे.
आजपासून सर्व सुरळीत होईल. सर्व अधिकाऱ्यांनी किमान २ तासांतून एकदा लोकांना माहिती देण्यात येईल असे सांगितले आहे. प्रशासनाकडे आवश्यक बेड्स आहेत. मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा थोडा कमी आहे असे सांगितले. यावेळी डॉ. पल्लेद, नोडल अधिकारी शारदा कोलकर व अधिकारी उपस्थित होते.