कर्नाटक राज्यातील लाॅक डाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत येत्या 23 मे रोजी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज दिली.
बेंगलोर येथे भाजी विक्रेते, ऑटो रिक्षा चालक आदी समाजातील विविध घटकांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीत ‘कोरोना कर्फ्यू’ येत्या 24 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत असेल. मात्र तत्पूर्वी ते 23 मे रोजी हा कर्फ्यू वाढवायचा की नाही याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसात राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. परंतु तरीदेखील सध्या दररोज 30 हजाराच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आढळून येत आहेत.
एकंदर सध्या येडियुरप्पा सरकार प्रचंड दडपणाखाली असून निजद आणि काँग्रेस हे विरोधी पक्ष देखील संपूर्ण लाॅक डाऊनची मागणी करत आहेत. तथापि तसे पाऊल उचलण्यापूर्वी सरकारला त्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाचा आणि जनतेला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाचा विचार करावा लागणार आहे.