Sunday, November 10, 2024

/

कोरोनासंदर्भात ‘या’ गल्लीत पार पडली युवकांची आदर्शवत बैठक

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या संकटमय परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या आसपासच्या आणि निकटवर्तीय लोकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करावी, असे आवाहन कंग्राळ गल्ली येथील युवकांच्या बैठकीत करण्यात आले.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गल्लीतील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी आज सायंकाळी कंग्राळ गल्ली येथील युवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील पंच परशराम दरवंदर हे होते. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे लोकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण दूर करणे. कोरोना प्रतिबंधक लसीबाबत माहिती देणे आणि ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही अशा 45 वर्षावरील व्यक्तींना लस घेण्यास प्रवृत्त करणे.

प्रत्येकाच्या घरात कोरोनाशी संबंधित ऑक्सीमीटर वगैरे सारखी आवश्यक उपकरणे ठेवणे. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय अवलंबण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे. प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या शक्‍यतो घरात ठेवणे, हे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

गल्लीतील लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. सध्याच्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत बरेच लोक फेसमास्क न घालता वावरत असतात. त्यांच्यामुळे मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. तेंव्हा अशा लोकांना फेसमास्क वापरण्यास भाग पाडणे. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर सोडू नये याबाबत पालकांना सुचित करण्याचे बैठकीत ठरले. सध्या ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेंव्हा गल्लीसाठी ऑक्सीजन सिलेंडरची सोय करता येईल का? त्याचप्रमाणे आजकाल कोरोनाच्या संकटामुळे सर्दी -पडसे यासारख्या किरकोळ आजारांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश मंडळी आजार अंगावर काढताहेत. तेंव्हा गल्लीतील लोकांसाठी ओळखीतील एखाद दुसरा डॉक्टर उपलब्ध करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.Kangral galli meeting

एखाद्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर त्याच्या कुटुंबियांना धीर देणे. तसेच आवश्यक मार्गदर्शन आणि मदत करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे खबरदारी म्हणून गल्लीत भाडेकरू असणाऱ्या कुटुंबांची माहिती गोळा करून कोरोनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर लक्ष ठेवणे. गल्लीतील गरजू लोकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी कंग्राळ गल्लीतील कै. गजानन बाबुराव पाटील, कै. संदीप नारायण चौगुले आणि कै. अर्जुनराव गोंडाडकर या दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. सामाजिक अंतराचा नियम पाळून पार पडलेल्या या बैठकीस रमेश मोरे यांच्यासह गल्लीतील सर्व युवक आवर्जून उपस्थित होते. दरम्यान, आपल्या गल्लीतील नागरिकांच्या हितासाठी कंग्राळ गल्लीतील युवकांनी उचललेले हे पाऊल इतर गल्ल्यातील युवकांसाठी आदर्शवत आहे. कंग्राळ गल्ली प्रमाणे इतर गल्ल्यांमध्ये कोरोनाबाबत दक्षता घेतल्यास या जीवघेण्या रोगाला आळा घालणे फारसे कठीण जाणार नाही, हे नक्की.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.