बेळगावात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्यांच्या उपचाराकरिता बेड, आयसोलेशन केंद्र आणि ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन ऑटोनगर येथील कर्नाटक राज्य वस्त्रोद्योग पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादितच्या (केएसटीआयडीसीएल) प्रशस्त हवेशीर हॉलमध्ये आयसोलेशन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप नेते व कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचीव किरण जाधव यांनी राज्याचे अवजड व लघु उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे.
शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि त्यांच्या उपचाराकरिता बेड, आयसोलेशन केंद्र आणि ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून भाजप नेते किरण जाधव यांनी कर्नाटकचे अवजड व लघु उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांची शहरातील सरकारी विश्रामधाम येथे भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले.
बेळगावात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्यांच्या उपचाराकरिता बेड, आयसोलेशन केंद्र आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. तेंव्हा बेळगावातील ऑटोनगर येथे स्थित केएसटीआयडीसीएलच्या रिकाम्या पडून असलेल्या हॉलचा सदुपयोग करून घ्यावा. हा प्रशस्त 35 ते 40 हजार चौरस फूटाचा हॉल हवेशीर आणि सर्व दृष्ट्या अनुकूल आहे. तेथील परिसरात खूप झाडे असल्या कारणाने तेथे कोविड आयसोलेशन केंद्र लवकरात लवकर सुरू करावे.
जेणेकरून उपचार घेणाऱ्या रुग्णांना शुद्ध ऑक्सिजन मिळेल व रुग्ण लवकर बरे होतील, शिवाय रुग्णांची योग्य व्यवस्था होईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन स्वीकारून मंत्री जगदीश शेट्टर यांनी केएसटीआयडीसीएल हॉलमध्ये आयसोलेशन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.