कोरोना आला आणि सण समारंभ व आनंद हिरावून घेऊन गेला असेच चित्र आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान सणावरही या महारोगाने विरजण आणले आहे. तरीही हा सण उत्साहात घरच्याघरी साजरा केला जाणार आहे. सामुदायिक पातळीवर मात्र हा सण सलग दुसऱ्या वर्षी साजरा होणार नाही याची नाराजी आहे.
मागीलवर्षी रमजान महिना सुरू झाला आणि प्रशासनाला कोरोनाचे कडक निर्बंध घालावे लागले. घरीच नमाज आणि प्रार्थना करीत आणि सणाला घरच्या घरीच प्रार्थना करीत रमजान ईद साजरा करण्यात आला.
यावर्षीही असेच वातावरण समाजाच्या भावनांना आवर घालणारे ठरले कारण कोरोनाची संख्या प्रमाणाबाहेर वाढत चालल्याने पुन्हा कडक नियम आणि निर्बंध बसविण्यात आले. या पार्श्वभूमीवर खरेदी नाही, वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल नाही आणि एकूणच वातावरण शांत आहे.
सरकार च्या बरोबरीनेच मुस्लिम धर्मियांच्या वक्फ बोर्डानेही नियम घालून दिले आहेत. समाजाच्या आरोग्यासाठी धार्मिक भावनांना आवर घालावा असे आवाहन या बोर्ड ने केले असून मुस्लिम धर्मीय ते आवाहन काटेकोरपणे पाळत आहेत.
रमजान च्या महिन्यात विधायक कामे करून आपले कर्तव्य बजावण्याची शिकवण मुस्लिम धर्मात आहे. कोरोना हे संकट न समजता काम करण्याची एक संधी मानून मुस्लिम धर्मियांनी मदतीचा वसा मात्र जोरदारपणे जपला आहे.