मान्सूनचा पाऊस दरवर्षी 6 ते 7 जून ला दाखल होतो, पण यावर्षी बेळगाव शहरात रोज पडणारा पाऊस पाहिला की पावसाचे वेळापत्रक बदलले आहे काय असा प्रश्न पडत आहे. रविवारी पहाटेही शहरात पावसाने जोरदार मारा केला आहे.
यावर्षी आडोळ्याचा पाऊस एप्रिल महिन्यापासूनच सूरु झाला आहे. हा पाऊस दुपार नंतर किंवा सायंकाळी पडत होता. मे महिना सुरू झाला आणि पहाटे तसेच दिवसा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. वातावरण ढगाळ होऊन विजांचा गडगडाट करीत पहिल्या पावसाप्रामाणेच सरींचा मारा होत असून यामुळे शहराचे वातावरण बदलून जात आहे.
कोरोनाच्या संकटछायेत नागरिक आधीच हैराण झाले आहेत. यातच ढगाळ वातावरणामुळे उष्णतेमुळे नागरिक अधिक हैराण होत आहेत. पाऊस पडण्यापूर्वी उष्णता वाढते आणि नंतर थंडी पडते व काही काळानंतर पुन्हा उष्णता अधिक होते यामुळे थंड गरम असा वातावरण बदल सर्दी, खोकला आणि ताप सारखे आजार निर्माण करीत आहे.
सध्या कोरोना काळात आरोग्य जपण्याची गरज आहे. पण निसर्गातील आणि हवामानातील बदल आरोग्य बिघडण्याची व्यवस्था करीत आहेत. यामुळे नागरिकांची परिस्थीती बिकट झाली आहे.