कोरोनाचा मोठ्या प्रमाणात वाढलेला प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्यामध्ये काल रात्रीपासून 14 दिवसाचा कोरोना कर्फ्यू जाहीर केलेला आहे. मात्र या आदेशाचा फज्जा उडवताना उचगावमध्ये आज कोरोनाचे नियम धाब्यावर बसवताना चक्क डॉल्बी लावून लग्नाची वरात काढण्याचा प्रकार घडला.
उचगावमध्ये आज बुधवारी बरेचसे लग्न समारंभ होते. यापैकी कांही लग्न शासनाच्या नियमानुसार लावण्यात आली, तर काही लग्नांमध्ये नियम धाब्यावर बसवून डॉल्बीचा दणदणाट आणि जल्लोष पहावयास मिळाला. कोरोना संदर्भातील निर्बंध कठोर केलेले असताना वाजप लाऊन वरात काढण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत होते. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
शासनाने एकिकडे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केलेला असून सर्वत्र सकाळी 6 ते 10 या वेळेत दैनंदिन व्यवहार ते देखील फक्त जीवनावश्यक वस्तूंचा संदर्भातील व्यवहार सुरू ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. सकाळी 10 वाजल्यानंतर करसु अर्थात संचार बंदीचा आदेश असतानाही उचगावमध्ये नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत. याशिवाय लग्नसमारंभासाठी फक्त 50 माणसांची परवानगी असताना 200 ते 500 लोक लग्नामध्ये सहभागी होत असून वरातीचा धुमधडाकाही सुरु आहे. कोरोना संसर्गाच्या तीव्रतेत भर घालणार्या या प्रकाराकडे शासनाचे ही साफ दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता वाढली असून अलीकडे कांही दिवसात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण बेळगाव तालुक्यात म्हणजे ग्रामीण भागात आढळून येत आहेत. मात्र याचे गांभीर्य उचगावमधील कोणालाच नसल्याचे दिसून येत असून नागरिक मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. तेंव्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.