मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज सोमवारी जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात बेळगावशी संबंधित दोन महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांना निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुढील 2021 -2022 या आर्थिक वर्षासाठी अंदाजे 2.46 लाख कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प जाहीर केला.
आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने बेळगावच्या नियोजित रिंग रोड भूसंपादनासाठी 50 टक्के निधीची तरतूद 140 कोटी रुपयांच्या स्वरूपात केली आहे. उर्वरित 140 कोटी रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जातील. त्यातून रिंगरोड निर्माण केला जाईल.
त्याचप्रमाणे धारवाड -कित्तूर -बेळगाव या 76 किमी अंतराच्या नव्या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार तर्फे 463 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे विविध विकास कामे आणि कित्तूर किल्ल्यात पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कित्तूर विकास प्राधिकरणाला 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय बेळगावमध्ये पाणी चांचणी प्रयोग शाळेची स्थापना, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन, किचन हाउसिंग लर्निंग सेंटर (घर स्वच्छता प्रशिक्षण केंद्र), बेळगावातील प्रादेशिक अन्नसुरक्षा प्रयोग शाळेची सुधारणा आणि बेळगाव महापालिकेच्या खत प्रकल्पाचा विकास यासाठीदेखील अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटकमध्ये स्मार्ट हॅण्डलूम डिझाइन स्टुडिओ उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षात राज्यातील 19 जिल्हे आणि 100 तालुक्यांमध्ये 25 आणि 6 खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) उभारले जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गो शाळा उभारण्यासाठी देखील अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे.