Thursday, May 2, 2024

/

प्रारंभिक शिक्षण एक जटिल निवड; परंतु अनुकूलता पाहणे गरजेचे

 belgaum

सध्याच्या प्रचंड स्पर्धात्मक युगात सुशिक्षित पालक या नात्याने आपणा सर्वांना आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणे आणि सामाजिक गरजा भागवण्यासाठी त्यांना मूलभूत शिष्टाचार शिकवणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव आहे. गुरुकुल शिक्षण पद्धती ते आजची ॲप्सद्वारे डिजिटल शिक्षण पद्धती असा फार दीर्घ पल्ल्याचा प्रवास करून आजच्या गरजा, आवश्यकता आणि जीवनपद्धतीशी आपण सर्वांनी जुळवून घेतले आहे, तथापि आपली निवड योग्य, चुकीची किंवा तर्कसंगत होती का? हा प्रश्न स्वतःला करणे गरजेचे आहे.

जीवन पद्धतीतील बदलामुळे स्वायत्त उत्पन्न, वेळेची कमतरता आणि संयुक्त कुटुंब पद्धतीपासून विभक्त कुटुंब पद्धतीपर्यंत झालेल्या स्थित्यंतरामुळे शिकवण्याच्या शिकण्याच्या परिस्थितीत बदल झाला आहे. आजकाल आपल्या मुलांना एखाद्या मोठ्या शाळेत दाखल केले, मोठी फी भरली की आपल्या पुरता विषय मिटला असे जर पालकांना वाटत असेल तर दुर्दैवाने ते चूक आहे. देश भाषा अर्थात स्थानिक भाषा माध्यमाच्या शाळा (व्हर्नाक्युलर मीडियम स्कूल्स) आता फक्त ज्यांना मोठी शाळा आणि तितकीच मोठी फी परवडत नाही अशा कमनशिबी मुलांसाठी उरल्या आहेत.

परंतु दोन दशकापूर्वी वेगळी परिस्थिती होती. त्यावेळी कन्नड मराठी किंवा हिंदी माध्यमाच्या शाळांमधून मुले भारतीयत्व शिकतील याची काळजी घेतली जायची. त्याकाळी मुलांमध्ये सांस्कृतिक मूल्य वाढणं, भारतीय सण कसे साजरे करावेत हे शिकवणं, त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवणं आणि मुलांना योग्य प्रकारे घडवल जातय की नाही? याची भारतीय पद्धतीने खातरजमा केली जायची. मातृभाषेला महत्त्व आणि प्रोत्साहन दिलं जायचं. त्यामुळे ते मुलांच्या वागण्यात प्रतिबिंबित होत असायचं.

 belgaum

शाळेच्या आधी मुलांसाठी बालवाडी निवडण्याच्या बाबतीत पालकांमध्ये जागृती निर्माण करणे यासाठी हा लेखन-प्रपंच आहे. तेंव्हा एखाद्याने आपल्या मुलासाठी चांगली बालवाडी कशी निवडावी? याला पर्याय खूप आहेत, परंतु अनुकूलता पाहणे महत्त्वाचे आहे. एक शिक्षक, गुरू आणि प्रशासक या नात्याने स्वअनुभवावरून मला असे वाटते की बालवाडीची निवड ही मुलांच्या बाल्यावस्थेतील विकास आणि त्याच्या बुद्धिमत्तेची वाढ एक विद्यार्थी आणि व्यक्ती म्हणून त्याचे भविष्य परिभाषित करते. तुमच्या मुलांसाठी बालवाडी निवडताना ज्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला गेला पाहिजे ती मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत.

नांव पाहून शाळा न निवडता, तेथील संस्कृती पाहून शाळा निवडा. भविष्यात तुम्ही आपल्या मुलाला ज्या शाळेत दाखल करू इच्छिता त्या शाळेत तुमच्या आधी ज्यांनी आपल्या मुलांना दाखल केले त्या पालकांची चर्चा करा. संबंधित शाळेत दाखल केल्यानंतर मुलांच्या वागण्यात कांही बदल झाला आहे? का हे त्यांना विचारा. वैयक्तिक खाजगीत एकदा शाळेला भेट द्या. तेथील शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी बोलून अभ्यासक्रमाची चौकशी करा. अभ्यासक्रम हा फक्त शैक्षणिक दृष्ट्या केंद्रित नसावा तर त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा तपशील, मूल्य जोडणारे कार्यक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमांचा तपशील देखील असायला हवा. शाळेच्या उपक्रमांच्या तक्ता तपासून पहा. उपक्रमाचा तक्ता हा वांशिक संस्कृती, भारतात साजरे केले जाणारे सण, मातृभाषेत बोलण्याची संधी आणि ऐक्याची भावना यावर भर देणारा असला पाहिजे. त्याचप्रमाणे शालेय उपक्रमात पर्यावरण विषयक जागृती आणि सामाजिक कारणे समाविष्ट आहेत की नाहीत हे शाळा प्रशासनाशी चर्चा करून विचारायला विसरू नका. कारण वयोमानानुसार मुले निसर्गाची जोडली जाणं आणि त्यांना सामायिकरणाच (शेअरिंग) महत्व कळून त्यांची सहानुभूतीशील मानसिकता वृद्धिंगत होण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही कांही मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी पालकांना त्यांच्या लाडक्या मुलांसाठी चांगली बालवाडी निवडण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. प्रतिकूल काळात मुलांना शिकवणे हे पालक आणि शिक्षकांसाठी आव्हानात्मक कार्य आहे. परंतु बालवाडीची परिवर्तनशील तंदुरुस्त आणि योग्य निवड मुलांच्या समग्र विकासात मोठा फरक घडवून आणू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. लवकरच आणखी कांही लेख तुमच्यापर्यंत आणत आहे.

-क्षमा कुलकर्णी

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.