8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील महिलांची प्रेरणादायी यशोगाथा खास बेळगाव लाइव्हच्या वाचकांसाठी…
अनेकवेळा मुलींचे शिक्षण हे केवळ नावापुरतेच असतेच. साधारण लग्नासाठी वारपक्षाला सांगण्याइतपत शिक्षण असावे, असा समज समाजात अनेक ठिकाणी आजही तसाच आहे. परंतु त्यापलीकडेही मुलींना उच्चशिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात यशाचा टप्पा गाठण्याची इच्छा कित्येकवेळा दबली जाते. याला कारणीभूत आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती आणि वैचारिक क्षमताही असते. हळूहळू स्त्रीशिक्षणाचे महत्व प्रत्येकाला पटत असून प्रत्येक वर्गातील मुली शिक्षणाकडे भर देत असल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीच्या काळात हा प्रकार घडत असला तरी अलीकडच्या काळात स्त्री शिक्षणाबद्दलची मानसिकता सकारात्मकतेने बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्या काळात मुलींच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहायचे, आज दिवस पालटत चालले तसे मुली शिक्षण घेण्यात जशा अग्रेसर आहेत, त्याचपद्धतीने इतरांना शिक्षण देण्यातही अग्रेसर आहेत. महिला शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या स्नेहा सागर पाटील यांचे नावही अशा महिलांमध्येच येते.
शिक्षणाची अत्यंत आवड असल्याने आपले शिक्षण पूर्ण करून त्यांनी अध्ययन क्षेत्रात भरारी घेतली. सेंट जोसेफ या शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वयाच्या विसाव्या वर्षी सागर पाटील यांच्याशी विवाह झाला. परंतु आपली शिक्षणाची आवड असल्याचे सांगत त्यांनी विवाहानंतरदेखील आपले शिक्षण पुढे सुरु ठेवण्याचा विचार केला.
वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास पूर्ण करून पदवी मिळविण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या स्नेहा पाटील यांना हि संधी मिळाली नाही. परंतु हार न मानता आणि मागे न हटता त्यांनी सेंट जोसेफ टीटीआय महाविद्यालयात प्रवेश घेऊन डी. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात सर्वोच्च स्थान मिळवत त्यांनी हा टप्पा पार केला.
डी. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून डिव्हाईन प्रॉव्हिडन्स शाळेत अध्ययनाचे कार्य सुरु केले. त्यानंतर सेंट मेरी हायस्कुलमध्ये त्यांनी अध्ययन सुरु करून विद्यादानाचे कार्य सुरु ठेवले. सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे अध्ययन करणाऱ्या स्नेहा पाटील यांनी कोणत्याही परिस्थिती आपली इच्छा आणि जिद्द सोडता काम नये, असा सल्ला आताच्या तरुण पिढीला दिला आहे.
आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, कष्ट, जिद्द आणि चिकाटी ठेऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्या मांडतात. स्नेहा पाटील यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीसाठी ‘बेळगाव लाईव्ह’तर्फे शुभेच्छा!
-वसुधा कानूरकर सांबरेकर