बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवार ३१ मार्च हा शेवटचा दिवस होता. आजपर्यंत भाजप, काँग्रेस, समिती, शिवसेना यासह एकूण १८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यामध्ये शिवसेनेचे के. पी. पाटील यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांचे नाव चौदाव्या स्थानी आहे.
भाजपमधून दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसमधून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हेदेखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ३ एप्रिल ही अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख असून यानंतर एकंदर चित्र स्पष्ट होईल.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर भाजपच्या मंगला अंगडी, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी, तिसऱ्या क्रमांकावर सर्व जनता पार्टीचे अशोक हनजी, चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे कृष्णाजी पाटील, पाचव्या क्रमांकावर कर्नाटक राष्ट्र समितीचे विवेकानंद घंटी, सहाव्या क्रमांकावर हिंदुस्थान जनता पार्टीचे वेंकटेश्वर महास्वामीजी, सातव्या क्रमांकावर कर्नाटक कामगार पक्षाचे सुरेश मरलिंगन्नवर, आठव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आपासाहेब कुरणे, आठव्या क्रमांकावर गुरुपुत्र कुल्लूर, दहाव्या क्रमांकावर गौतम कांबळे, अकराव्या क्रमांकावर नागाप्पा कळसन्नवर, बाराव्या क्रमांकावर बसवराज हुद्दार, तेराव्या क्रमांकावर भारती चिक्कनरगुंद, चौदाव्या क्रमांकावर शुभम शेळके, पंधराव्या क्रमांकावर श्रीकांत पडसलगी, सोळाव्या क्रमांकावर सुरेश परगण्णवर, सतराव्या क्रमांकावर संगमेष चिक्कनरगुंद आणि अठराव्या क्रमांकावर हणमंत नांगनूर यांचा समावेश आहे.
शेवटच्या दिवशी 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने मंगला सुरेश अंगडी, शिवसेनेच्या वतीने के. पी. पाटील ऊर्फ कृष्णाजी पुंडलिक पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी काँग्रेसच्या वतीने आमदार सतीश जारकीहोळी आणि म. ए. समितीच्या वतीने शुभम शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चुरशीने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.