Friday, April 26, 2024

/

“या” स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणाची जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे मागणी

 belgaum

टिळकवाडी दुसरे रेल्वे फाटक आणि धर्मवीर संभाजी चौक (बोगरवेस) तेथे धूळखात पडून असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करून ती खुली केली जावीत. त्याचप्रमाणे व्हॅक्सिन डेपो मैदान येथे स्वच्छता मोहीम राबवून याठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी फेसबुक फ्रेंड्स सर्कलने जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे फाटकानजीक असलेल्या बस थांब्याजवळ, त्याचप्रमाणे ध. संभाजी चौक येथील बसस्थानकाच्या ठिकाणी सार्वजनिकांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

मात्र गेल्या दोन वर्षापासून ही स्वच्छतागृहे दुर्दशा झालेल्या अवस्थेत धूळखात पडून आहेत. सदर स्वच्छतागृहे असून नसल्यासारखी असल्यामुळे नागरिकांची विशेषता महिला वर्गाची मोठी कुचंबना होत असते. कारण या दोन्ही ठिकाणी जवळपास कोठेही सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. यासाठी जर याठिकाणी अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची व्यवस्थित दुरुस्ती करून ती उपयोगात आणल्यास लोकांची चांगली सोय होणार आहे. तेव्हा संबंधित स्वच्छतागृहांचे युद्धपातळीवर नूतनीकरण करून ती सार्वजनिकांसाठी खुली करावीत.

 belgaum

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या ठिकाणीदेखील स्वच्छतागृहांची आणि साफसफाईची आवश्यकता आहे. या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे सकाळी फिरावयास येणाऱ्यांना तसेच मैदानावर व्यायामासाठी किंवा सरावासाठी आलेल्या क्रीडापटूंची मोठी गैरसोय होत असते. खाजगी संघटनांतर्फे या मैदानावर मोठ्या क्रिकेट स्पर्धा भरविल्या जातात. या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी परगावचे खेळाडू येत असतात मात्र या मैदानाच्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे सदर खेळाडूंची कुचंबणा होत असते.Toilets

त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगले स्वच्छतागृह आणि ताजेतवाने होण्यासाठी विश्रांती गृहाची उभारणी होणे आवश्यक आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीच्या ठिकाणी कांही सरकारी फिरती स्वच्छतागृहे (मोबाईल व्हेईकल टॉयलेट) आहेत. त्यापैकी एक व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या ठिकाणी तैनात केल्यास नागरिक व मुले त्याचा वापर करू शकतील.

व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. या ठिकाणच्या झाडाच्या आडोशाला तसेच मैदानाच्या सभोवती असलेल्या कट्ट्याच्या आडोशाला गुटखा व सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या, बियर बाटल्या यांचा खच पडलेला असतो.

या कचऱ्याची वेळच्यावेळी साफसफाई करून उचल करणे आवश्यक आहे. ज्यामुळे सदर मैदान स्वच्छ राहण्याबरोबरच येथील वातावरण देखील स्वच्छ राहील. तसेच मैदान अस्वच्छ करण्याचा हा गैरप्रकार थांबविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. या मैदानाच्या जवळपास असणारी पानपट्टीची दुकाने तात्काळ हटवावीत. अन्यथा त्यांचा परिणाम येथे खेळावयास येणाऱ्या मुलांवर होण्याची शक्यता आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.