रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणी संबंधित युवतीने रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पुन्हा एक व्हिडीओ या युवतीने प्रसारित केला आहे. माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे या युवतीने व्हिडिओमध्ये नमूद केले आहे. त्यानंतर वकील जगदीश यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातील वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणातील त्या युवतीने वकील जगदीश यांच्यामार्फत बेंगळूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही युवतीने म्हटले आहे.
सीडी प्रकरणातील युवतीने स्वहस्ताक्षरात लिहिलेली तक्रार वकील जगदीश यांनी पोलीस आयुक्तांच्या दाखल केली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सदर तक्रार कब्बन पार्क पोलिस ठाण्यात नोंदविण्यात यावी अशी सूचना त्या युवतीचे वकील जगदीश यांना केली आहे. त्यामुळे आता या वादग्रस्त सीडी प्रकरणी कब्बन पार्क पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
गेल्या २४ दिवसांपासून आपल्या जीवाला धोका आहे आणि यापुढील काळातही असल्याचे जाणवत आहे. सर्व पक्षाचे नेते, सर्व संघटना, राज्यातील जनता माझे समर्थन करत आहेत. यामुळे मला धैर्य मिळाले आहे. प्रोत्साहन मिळाले आहे. या प्रोत्साहनामुळे मी शुक्रवारी दुपारी वकिलामार्फत तक्रार दाखल केल्याचे या महिलेने व्हिडिओमध्ये नमूद केले आहे. आतापर्यंत या युवतीने 3 व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत.
या युवतीने केलेल्या लिखित तक्रारीत, आपल्याला सरकारी नोकरी देण्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवून व्हिडीओ कॉलमार्फत अश्लील बोलणी केली आहेत. कर्नाटक राजभवनातून व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत आपल्याला कॉल करायला लावला. शरीरसंबंध ठेवले, आणि त्यानंतर कामाच्या ऐवजी पैसे देईन असे सांगितले. यावेळी जाब विचारला असता अश्लील शब्द वापरून मला हाकलुन देण्यात आले. आणि यानंतर सादर व्हिडीओ व्हायरल झाला. यासंदर्भातील तक्रार करू नये, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. माझ्या जीवाला धोका असून माझ्यासह माझ्या कुटुंबीयांचा जीवही धोक्यात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबियांना सुरक्षा मिळावी असे आवाहनदेखील सदर युवतीने केले आहे.