.बेळगाव महापालिकेसमोरील तिरंगा ध्वजाचा अवमान करणारा बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज हटवावा, या मागणीसाठी आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला हादरवणारा विराट मोर्चा काढण्यात आला.
बेळगाव महापालिकेसमोरील तिरंगा ध्वजाचा अपमान करणारा कांही मूठभर कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी लावलेला बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटवण्याची सातत्याने मागणी करून देखील गेल्या सुमारे 2 महिन्यापासून प्रशासनाकडून तो ध्वज हटविण्यास टाळाटाळ केली जात आहे. याच्या निषेधार्थ तसेच तो लाल -पिवळा ध्वज त्वरित हटवावा, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनानुसार आज सकाळी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ध. संभाजी चौक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी समितीचे नेते आणि समितीचा बॅनर व भगवे ध्वज घेतलेल्या म. ए. समिती महिला आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. लाल-पिवळ्या ध्वजाच्या आणि प्रशासन व सरकारच्या विरोधात घोषणा देत निघालेल्या या मोर्चात शहर परिसर तसेच तालुक्यातील हजारो कार्यकर्ते आणि मराठी भाषिक सहभागी झाले होते.
नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, भगव्या झेंड्याचा विजय असो, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, तिरंग्यासमोर लाल -पिवळा ध्वज फडकवणाऱ्या देशद्रोही संघटनांचा धिक्कार असो, लाल -पिवळा ध्वज फडकवून देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा अधिकार असो, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी मोर्चेकर्यांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चातील डौलाने फडकणारे भगवे ध्वज आणि भगवे फेटे घातलेले कार्यकर्ते या गोष्टी सार्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. विशेष करून मोर्चाच्या अग्रभागी असणाऱ्या समितीच्या रणरागिनी आवेश पूर्ण घोषणाबाजी करताना दिसत होत्या. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चाच्या दुतर्फा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
धर्मवीर संभाजी चौकातून निघालेला हा विराट मोर्चा यंदे खुट, कॉलेज रोड मार्गे चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता. तथापि मोर्चाच्या विराट स्वरूपाची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सरदार हायस्कूल मैदानावरच मोर्चेकऱ्यांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. अप्रत्यक्षरीत्या मराठी भाषिकांसमोर नमते घेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ स्वतःहून सरदार हायस्कूल मैदानावर हजर झाले आणि त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी आणि अन्य नेत्यांनी सादर केलेले निवेदन स्विकारले. त्याचप्रमाणे येत्या एप्रिल महिन्यामध्ये अधिवेशन आहे आणि लोकसभेची पोटनिवडणूक होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे एप्रिल पूर्वी आपण कन्नड संघटनांच्या नेते मंडळींशी चर्चा करून लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात निश्चितपणे अंतिम निर्णय घेऊ, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी प्रारंभी कन्नडमध्ये बोलण्यास सुरुवात केली, त्यावेळी उपस्थित समस्त मराठी भाषिक आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन त्यांना मराठीत बोला असे सांगितले. उपस्थितांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन आपल्याला मराठी येत नसल्याचे सांगून नमते घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये वरीलप्रमाणे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना मुळीच मान्य नव्हते. लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात तात्काळ निर्णय द्यावा अशी त्यांची मागणी होती. परंतु दीपक दळवी यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच जोपर्यंत महापालिकेसमोरील लाल -पिवळा ध्वज हटविला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.
दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, माजी आमदार मनोहर किणेकर, नेताजी जाधव, निंगोजी हुद्दार, राजाभाऊ पाटील, एल. आय. पाटील, संतोष मंडलिक, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, किरण गावडे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, सुनील जाधव ,राजू पावले, रवी निर्मळकर आदी नेतेमंडळी मोर्चाच्या अग्रभागी होती.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी फोन द्वारे मोर्चाला पाठिंबा देत शिव प्रतिष्ठान बेळगावच्या लढ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे आश्वासन देत भविष्यात मनपा वर भगवा न फडकल्यास बेळगावातील प्रत्येक घरावर भगवा फडकावू असा इशारा शासनाला दिला
मोर्चादरम्यान म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे सातत्याने ध्वनीक्षेपकावरून कोणत्याही प्रकारे गालबोट न लावता मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन करताना दिसत होते. मध्यवर्गीय महाराष्ट्र एकीकरण समितीसह बेळगाव तालुका म. ए. समिती,शिव प्रतिष्ठान, खानापूर तालुका म. ए. समिती, निपाणी म. ए. समिती, म. ए. समिती महिला आघाडी, शिवसेना, श्रीराम सेना हिंदुस्तान, मराठी युवा मंच आदी मराठी भाषिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शहरासह गावागावातील हजारो मराठी भाषिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
मराठी भाषिकांचा आजचा हा महामोर्चा असफल करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परगावचे कार्यकर्ते मोर्चाच्या स्थळापर्यंत पोहोचू नयेत यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्ते अडविण्यात आले होते. तथापि पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांचे जथ्थेच्या जथ्थे मोर्चामध्ये येऊन सहभागी झाले होते. मोर्चाची सरदार हायस्कूइल मैदानावर सांगता झाली. या ठिकाणी समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. त्यावेळी मैदाना सभोवार कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सरदार मैदाना जवळ ठिय्या आंदोलन-
https://www.facebook.com/livebelgaum/videos/170943118028379/