बहुचर्चित भाजपा उमेदवारी अध्यायाची अखेर सांगता झाली असून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा पोटनिवडणुक घोषित होण्यापूर्वी उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न संपूर्ण बेळगावसह राज्यभरात उपस्थित केला जात होता. घराणेशाहीला फाटा देत कार्यकर्त्याला संधी देणाऱ्या तत्वाच्या भारतीय जनता पार्टीने अखेर घराणेशाहीची ‘री’ ओढली आहे.
काँग्रेसमधून सतीश जारकीहोळी यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून माजी खासदार रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा होती. याआधी अशा अनेक इच्छुकांची यादीही भाजपकडे आली होती. मंगला अंगडी यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अंगडी यांची कन्या श्रद्धा शेट्टर यांच्या नावाची चर्चा होती. यासोबतच डॉ. रवी पाटील, डॉ. महंतेश कवटगिमठ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. खुद्द माजी मुख्यमंत्र्यांचेही नाव उमेदवारीच्या यादीत घेतले जात होते.
अखेर या सर्व गोष्टींना पूर्णविराम देत भाजपने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली असून मंगला सुरेश अंगडी यांना बेळगावमधून निवडणुक लढविण्यासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर बसवकल्याण येथे शरानु सालागर आणि मस्करी येथून प्रतापगौडा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बेळगावमध्ये निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांची नावे देखील अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. प्रचाराची रणधुमाळी आणि मतदान प्रक्रियेपर्यंत बेळगावमध्ये होणारी रंगतदार लढत लक्षवेधी ठरणार, हे नक्की.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी एक पत्रक देत पोट निवडणूक उमेदवारांची घोषणा केली आहे.