Thursday, November 28, 2024

/

जिद्द, कष्ट आणि मेहनतीच्या संघर्षाची ‘ती’ची प्रेरणादायी कहाणी

 belgaum

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील महिलांची प्रेरणादायी यशोगाथा खास बेळगाव लाइव्हच्या वाचकांसाठी…

जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पतीच्या निधनानंतरही आपला संघर्ष सुरु ठेऊन आपल्या तीन चिमुरड्यांसह संसाराचा गाडा एकटीने हाकत आयुष्यात पुढे जाणाऱ्या नीता चौगुले यांची प्रेरणादायी कहाणी… परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य असते. मनावरचे दडपण हलके करण्यासाठी श्रमासारखे दुसरे साधन नाही. झाडावर चढून फळ खाली आणावे तेव्हा त्याला किंमत प्राप्त होते. त्याचप्रमाणे जगातील मौल्यवान वस्तू परिश्रमाशिवाय प्राप्त होऊ शकत नाहीत, असे विचार श्रीमती नीता मनोहर चौगुले यांनी बेळगाव लाईव्हकडे व्यक्त केले. लीला चौगुले यांनी आपल्या पतीचा रद्दीचा व्यवसाय सांभाळत आजवर संसाराची अनेक आव्हाने पेलली आहेत. हेमुकलानी चौक येथे आपला रद्दीचा छोटेखानी व्यवसाय सांभाळत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांचे योग्य संगोपन केले आहे.

विज्ञानाच्या सोबतीने जग नक्कीच पुढे गेले. परंतु अजूनही समाजातील विटाळ विचारांना कोणीही कायमचे पुसून टाकले नाही. पतीच्या निधनानंतर पत्नीला आजही समाजात म्हणावा तसा मान सन्मान मिळत नाही. परंतु समाजाच्या विटाळ विचारांच्या पुढे जाऊन प्रगल्भ विचारसरणी घेऊन स्वतःसोबत स्वतःच्या संसाराचा डोलारा समर्थपणे पेलणाऱ्या अनेक महिला यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. पडद्यामागील कलाकार ज्याप्रमाणे एखादा चित्रपट यशस्वी करतात, अशाचपद्धतीने कित्येक महिला आपल्या संसाराचा महारथ ताकदीने चालवितात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लीला चौगुले.Leela chougule

स्वतः सुशिक्षित असल्यामुळे आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या मुलांनीही शिक्षण घेऊन योग्यस्थान प्राप्त करावे, हि तळमळ ठेऊन त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून दोन्ही मुलींनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय मुलगा आता पदवीचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. गणेश फेस्टिव्हलच्यावतीने देण्यात येणाऱ्या श्रमसेवा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता योग्य वाटचाल करत आपले ध्येय गाठावे, प्रत्येकाने शिक्षणाचे महत्व जाणून शिक्षणाची कास धरावी असे त्या सांगतात. शिक्षणाशी सर्व काही जोडले गेले आहे. महिलांचे समाजातील स्थान उंचावत आहे. यासाठी प्रत्येक महिलेने शिक्षणात अव्वल राहावे. कोणत्याही परिस्थितीचा सामना बिनधास्तपणे करावा, असा सल्ला त्या देतात. तुमच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. आपल्यासारख्या श्रमजीवी, कष्टकरी व्यक्तिमत्वाला ‘बेळगाव लाइव्ह’चा सलाम आणि आपल्या पुढील उदात्त वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

-वसुधा कानूरकर सांबरेकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.