8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील महिलांची प्रेरणादायी यशोगाथा खास बेळगाव लाइव्हच्या वाचकांसाठी…
साधारण ऐशी – नव्वदच्या दशकात स्त्री सबलीकरणाचा झंझावात भारतात आला. यामुळे स्त्रियांच्या पंखांना बळ मिळाले. ज्या मुलींच्या शिक्षणावरच बंदी होती त्या मुली आता उच्चशिक्षित होऊन इतरांना अध्ययनाचे धडे देत आहे. ”मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगी शिकली, कुटुंब शिकले’ असे संदेश केवळ भीतीवर लिहून जनजागृती करण्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन स्त्रीशिक्षणाचा खरे महत्व आता कुठे समाजाला पटू लागले आहे. पाटी -पुस्तक घेऊन इतरांकडे धडे गिरवायला जाणाऱ्या मुली, महिला आता इतरांना विद्यादान करीत आहेत. बेळगावमधील प्रा. डॉ. सरिता मोटराचे यांचे उदाहरण यापैकीच एक म्हणावे लागेल.
पूर्वाश्रमीच्या सरिता निंगाप्पा मोटरचे आणि आणि आताच्या मधुरा राम गुरव. एम. ए., बी. एड., पी. एचडी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सध्या एस. एन. के. पदवीपूर्व महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवा बजावित आहेत. उत्तम कांबळे यांच्या कथात्मक साहित्यावर २०१७ साली कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथे प्रबंध सादर करून त्यांनी पी. एचडी. पदवी प्राप्त केली. सध्या विविध संघटनांचा पदभार त्या सांभाळत असून कुद्रेमानी येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या आणि निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाजसेवा संस्था, कुद्रेमानी या संस्थांच्या त्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. तसेच बलभीम साहित्य संघ, कुद्रेमनी, प्रगतशील लेखक संघ, बेळगाव या संस्थांमध्ये सदस्या म्हणून काम पाहत आहेत.
विविध राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सामाजिक, साहित्यिक विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने देखील त्यांनी दिली आहेत.ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांच्या मुलाखतीवर आधारित ‘संवाद – अस्वस्थ नायकाशी’ या पुस्तकाचे 2019 साली पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी ‘सावित्रीज्योती जीवनगाथा’ हा गीतगायनाचा कार्यक्रमदेखील अनेक ठिकाणी सादर केला आहे. उत्तम कांबळे यांच्या साहित्यावर आधारित लेख, जाहिरातींची प्रभावशीलता, संयुक्त महाराष्टातील बुलंद आवाज, महिलांवरील लेख, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न, सावित्रीबाई फुले अशा विविध विषयावर त्यांनी लेखन केले असून त्यांनी लिहिलेले साहित्य अनेक मासिकांमधून आणि दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाले आहे.
स्त्री शिक्षणाची प्रेरकशक्ती सावित्रीबाई फुले, आपली भाषा आपली संस्कृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिला अधिकाराबाबतचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल, मराठी नाटकांचे सिनेमात रूपांतर, सीमा लढ्यातील बुलंद आवाज शाहीर अमरशेख, जागतिकीकरणात मराठी भाषेचे स्थान अशा अनेक विषयांवर अनेक चर्चासत्रात त्यांनी व्याख्यान दिले आहे. तसेच अनेक साहित्य संमेलनात सहभाग घेऊन व्याख्याने दिली आहेत. काव्यवाचन, सूत्रसंचलन असे छंद जोपासत त्यांनी कविसंमेलन, साहित्य संमेलन, राणी चन्नम्मा विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी काव्यवाचन आणि सुत्रसंचलन केले आहे.
महिला, तरुण पिढी यासह विविध विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. सर्जनशील नवलेखक कार्यशाळा, महिला सबलीकरण, पाल्यांच्या जडणघडणीत पालकांचे योगदान, परीक्षेला सामोरे जाताना, आजचा युवक आणि त्यांच्यासमोरील आव्हाने अशा विविध विषयांवर त्यांनी कार्यशाळा आणि शिबिरेही आयोजित केली आहेत. यासह निर्मिती समाजसेवा संस्थेमार्फत आरोग्य शिबीर, अभिप्रेरणा शिबीर, प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन, कुद्रेमानी हायस्कुलला सुसज्ज स्वच्छतागृहाचे बांधकाम, विविध शाळांमधून शैक्षणिक साहित्याचे वितरण, कामगार क्षेत्रातील कामगारांना मदत अशा अनेक बाबींमध्येही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याला ‘बेळगाव लाईव्ह’चा सलाम आणि पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!