टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट येथे रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्यात येत असल्यामुळे याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने सदर मार्गावर नेहमी ये-जा करणारे वाहन चालक अत्यंत त्रस्त झाले आहेत.
बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांमुळे विशेष करून रस्ते व पुलांच्या बांधकामांमुळे शहरात ठिकठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.
बहुतांश विकास कामे रखडत सुरू असल्याचा हा परिणाम असल्यामुळे वाहन चालक वैतागून गेले आहेत. टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी तर वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे फ्लायोवर ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दुपदरी मार्गांपैकी एकच रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे.
या बेळगाव -खानापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. परिणामी कोणतेही नियोजन नसल्यामुळे या रस्त्यावर दररोज वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांच्या तातडीच्या कामाचा खोळंबा होत असून वेळेचा अपव्यय होत आहे. तेंव्हा संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याठिकाणी रहदारी पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.