II इये मऱ्हाटिचीया नगरी, ब्रह्म विद्येचा सुकाळू करी II अशा शब्दात मराठीचा गौरव करणारे संत ज्ञानेश्वर, सतराव्या शतकामध्ये मराठीतून सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे संत तुकाराम, आणि मराठीत भाषाकोष तयार करून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारे छत्रपती शिवराय… अशा अनेक थोर महात्म्यांनी मराठी भाषेला समृद्ध केले. जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा दिनी बेळगावचे उद्योजक आणि शिवसंत संजय मोरे यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ने केलेली बातचीत-
अमृताहुनी गोड असलेली मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठीला समृद्ध अशी परंपरा आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया…तुका झालासे कळस..!’ अशा थोर संतांची परंपरा असलेली भाषा ही खरोखर अमृताहून गोड आहे. समृद्ध आहे. अशा वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठीचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचे उद्योजक संजय मोरे यांनी बेळगाव लाइव्हशि बोलताना व्यक्त केली. संपूर्ण बेळगावमध्ये छत्रपती शिवरायांची पताका घेऊन फिरणारे संजय मोरे यांना त्यांच्या शिवप्रेमाबद्दल रायगडावर शिवसंत या उपाधीने गौरविण्यात आले आहे. आपल्या भाषा अधिक समृद्ध व्हावी, संवर्धन व्हावे, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या, आणि भाषेच्या आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय मोरे यांनी आजच्या तरुण पिढीसमोर आदर्शवत विचारांची व्याख्या मांडून दिली आहे.
राकसकोप हे मूळ गाव असणाऱ्या संजय मोरे यांनी बेळगावमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात यशस्वी झेप घेतली आहे. यश ऑटोमोबाइल्स या नावाने सुरु असलेल्या त्यांच्या वाहन व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात भव्य शोरूम उभं केलं आहे. उद्योग जगतातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. उत्कट शिवप्रेम आणि मराठी भाषा प्रेम जपणारे संजय मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ‘एक दिवस गावासाठी’ हा भन्नाट उपक्रम राबविला आहे. कर्मचाऱ्यांप्रती आदर, आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या नात्यामुळे त्यांनी आजवर यशाचे शिखर गाठले आहे. प्रत्येक ग्राहकाशी सुसंवाद आणि प्रत्येकाची गरज ओळखून त्यांना योग्य ती सेवा देणे, हे त्यांच्या उद्योग क्षेत्रातील यशाचे गमक आहे. मराठी संस्कृती आणि शिवसंस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांनी दिलेल्या आदर्शानुसार राकसकोप येथे पुढाकार घेऊन लोकवर्गणीतुन छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन केली आहे.
राकसकोप गावाबाहेरील एकही व्यक्तीकडून देणगी न स्विकारता केवळ राकसकोप गावातील नागरिकांच्या वतीने देण्यात आलेल्या लोकवर्गणीतून त्यांनी हि मूर्ती स्थापन केली आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात ते शिवजयंतीचे आचरण करतात. व्याख्यानांचे आयोजन करतात. जनतेपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे ते अभ्यासक आहेत. त्यांच्या याच गोष्टींसाठी त्यांना शिवसंत या उपाधीने गौरविण्यात आले आहे.
आपल्या मातृभाषेचा अभिमान राखणे, म्हणजे दुसऱ्या भाषेचा दुराभिमान ठेवणे असे नाही. प्रत्येकाला अनेक भाषा अवगत होणे, ही काळाची गरज आहे. आज भलेही इंग्रजी जगाच्या दळणवळणासाठी वापरण्यात येणारी भाषा असली तरी आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी आपण पुढाकार घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे. इंग्रजी येणे हे आजच्या काळात आवश्यकच आहे. परंतु याबरोबरच आपली मातृभाषाही तितक्याच ताकदीने आपल्याजवळ असणे हेही महत्वाचे आहे. आज अनेक क्षेत्रात स्वतःची नावे उंचावणारे उद्योजक आहेत. याचप्रमाणे मराठी तरुणांनीही उयोगक्षेत्रात भरारी मारावी, असे ते सांगतात.
इ.स.१७५९ ते १९६१ पर्यंत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील अटक ते ओरिसा येथील कटक, अहम तंजावर ते तहम पेशावर पर्यंत मराठी भाषेने राज्य केले आहे. ‘मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले’ हि उक्तीही याच गोष्टीवरून पडली आहे. संतवाङ्मयाची परंपरा असलेली भाषा म्हणजे मराठी. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बहिणाबाई अशा थोर संतांनी मराठी भाषेला समृद्ध केले. छत्रपती शिवरायांनी भाषाकोष तयार करून मराठीला वैभव प्राप्त करून दिले. राजाश्रय मिळवून दिला. मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते. त्यामुळे मुलांना मातृभाषेवर व बोलीभाषेवर प्रेम करायला शिकवा, असे मत त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केले.
आज उद्योग क्षेत्रात म्हणावी तशी प्रगती मराठी तरुणांनी केली नाही. प्रत्येक भाषा अवगत करणे ही कला आहे. भाषेमुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक भाषा आली तर यात वावगं काहीच नाही. परंतु मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन उद्योगक्षेत्रात भरारी मारावी. जेणेकरून आपल्यासोबत काम करणारे कर्मचारीदेखील मराठी भाषा शिकतील. आज अनेक भाषिक आपल्या भाषेतूनच व्यवहार करतात. त्याचप्रमाणे मराठी तरुणांनीही पाऊल पुढे टाकावे, जेणेकरून मराठी उद्योजकांची संख्या वाढली तर कार्यालयीन भाषा म्हणून मराठीचा वापर होईल. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत प्रज्वलित करणारे संत ज्ञानेश्वर आणि अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे संत तुकाराम यांनी ज्यापद्धतीने भाषा संवर्धन केली, त्याचपद्धतीने आजही मराठी भाषेचे संवर्धन होणे, ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.