Sunday, April 28, 2024

/

हलगा -मच्छे बायपास नुकसान भरपाईसाठी कमिशनची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 belgaum

हलगा -मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी सकाळी रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी जमिनीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांचे कमिशन मागितले जात असल्याची तक्रार शेतजमीन मालक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली.

बायपास रस्त्यासाठी भूसंपादन केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी 57 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी 11 लाख रुपये कमिशन मागितले जात असल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष संत्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. हलगा -मच्छे बायपास रस्ता होण्यास कोणती अडचण येत आहे? या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान होऊ शकते? याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेण्यासाठी आज शनिवारी सकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सदर रस्त्याला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, प्रकाश नायक यांच्यासह अन्य शेतकरी नेते, शेतकरी आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

पायी चालत केलेल्या आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान ठीक -ठिकाणी थांबून जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी संबंधित जमीन मालक शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली. याचवेळी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कानावर नुकसानभरपाईमधील कमिशनची गोष्ट घातली. पाहणी दौर्‍याअंती शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, त्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेत हलगा -मच्छे बायपासबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ यांनी दिले.Halga machhe byepass

 belgaum

हलगा मच्छे बायपास रस्त्याची योजना रद्द करावी या आमच्या मागणीशी आम्ही ठाम आहोत. तसेच शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली जात असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालचे अधिकारी त्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या भागातील स्वतःच्या शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचे पैसे घेतलेले नाहीत आणि भूसंपादनासाठी परवानगी देखील दिलेली नाही. येथील शेतकऱ्यांपैकी जे दुसर्‍याची जमीन कसत आहेत अशा केवळ 10 टक्के शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचे पैसे घेतले आहेत. या बायपास रस्त्याच्या बाबतीत होत असलेला गैरप्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एजंटगिरी सुरू असल्याचेही दिसून आले आहे असे सांगून यामध्ये कांही वकील मंडळी आणि एसी ऑफिसमधील एजंट तसेच लँड माफिया कार्यरत असल्याची माहिती प्रकाश नायक यांनी दिली.

येथून 2 कि. मी. अंतरावर रिंगरोड करण्याची योजना आहे. तेंव्हा बायपास रस्ता याठिकाणी करण्याऐवजी त्या ठिकाणी करा अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हलगा -मच्छे बायपासद्वारे जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करून त्यांना रस्त्यावर आणण्याचा घाट रचला जात आहे. या रस्त्यामुळे फक्त शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही तर आसपासच्या 10 कि. मी. परिघातील नागरी वसाहतीवर देखील या रस्त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे असे सांगून हलगा -मच्छे बायपास रस्त्याचा प्रकल्प रद्द करावा, या मागणीवर येथील समस्त शेतकरी ठाम असल्याचे प्रकाश नायक यांनी शेवटी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.