जर आपण कर्करोगाविषयी गाफील राहिलो तर पुढील पाच वर्षात हृदयरोगापेक्षाही कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल अशी चिंता केएलई हॉस्पिटल येथील कर्करोग तज्ञ(ऑन्कोलॉजिस्ट) डॉ रोहन भिसे यांनी व्यक्त केली.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कर्करोग कसा उदभवतो, त्याची लक्षणे काय आहेत, कोणकोणत्या पद्धतीचे कर्करोग आहेत, महिलांना होणारे कर्करोग, त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजेत, आहार विहार, अति मांसाहार, जंक फूड, शारीरिक श्रम, व्यायाम, तंबाखू,सिगारेट, गुटखा तसेच दारूचे व्यसन, प्रत्येकाने अंगीकारायची जीवनशैली या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या शब्दात डॉ भिसे यांनी समजावून सांगितल्या.
उपस्थितांच्या कर्करोगाविषयी विचारलेल्या शंकाचे निरसन डॉ भिसे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात जायंट्सच्या प्रार्थनेने झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करण्यात आले.व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील, प्रमुख वक्ते डॉ रोहन भिसे आणि सचिव विजय बनसुर होते.उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक युनिट संचालक मदन बामणे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय फेडरेशन संचालक शिवराज पाटील यांनी करून दिला.अध्यक्ष संजय पाटील यांनी डॉ रोहन भिसे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
तसेच विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, युनिट संचालक मदन बामणे, फेडरेशन संचालक शिवराज पाटील, सखीच्या अध्यक्षा निता पाटील व संचालिका ज्योती अनगोळकर यांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.अध्यक्षीय समारोप करताना संजय पाटील यांनी प्रत्येकांनी कर्करोगाविषयी आपण सजग राहिलं पाहिजे. आजच व्याख्यान खूपच उदबोधक झाले असे सांगितले.
सूत्रसंचालन भरत गावडे यांनी तर आभार अनिल चौगुले यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास जायंट्स मेनचे तसेच जायंट्स सखीच्या पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.