भविष्यातील बेगमीसाठी सहकारी पतसंस्थेत ठेवलेली 12 लाख रुपयांची मुदत ठेव परत करण्यास पतसंस्थेने टाळाटाळ सुरू केल्यामुळे संपूर्ण कुटुंबानेच पतसंस्थेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याबरोबरच आत्महत्येची चिठ्ठी लिहून सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. अनसुरकर गल्ली येथील एका को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सध्या घडत असलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सोसायटीमध्ये ठेवलेली 12 लाख रुपयांची मुदत ठेव परत करण्यास गेल्या 2 वर्षापासून टाळाटाळ केली जात असल्याने भांदुर गल्ली येथील प्रकाश भरमा पाटील, त्यांची पत्नी अक्षता प्रकाश पाटील, मुलगा ओम प्रकाश पाटील, अक्ष प्रकाश पाटील, वडील भरमा लक्ष्मण पाटील आणि आई लक्ष्मी भरमा पाटील अशा सहा जणांनी आज सकाळपासून अनसुरकर गल्ली येथील त्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन छेडले आहे. आपली मुदत ठेव तात्काळ परत न मिळाल्यास आपण सामूहिक आत्महत्या करत असल्याची चिट्ठी देखील या सर्वांनी लिहून ठेवली आहे.
त्या सोसायटीमध्ये ठेवलेल्या माझ्या 12 लाख रुपये मुदत ठेवीची (फिक्स डिपॉझिट) मुदत संपून दोन वर्षे झाली तरी सोसायटीचे चेअरमन श्याम जाधव आणि कर्मचारीवर्ग संबंधित रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत आहेत. आज देतो उद्या देतो असे असे सांगून गेली 2 वर्षे मला झुलवत ठेवण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात सोसायटीने मला 360000 रु. आणि 60000 रु. असे दोन धनादेश दिले असले तरी गेल्या दोन वर्षात 6 वेळा हे धनादेश बँकेत जमा करून देखील वटलेले नाहीत.
गृहकर्जासाठी म्हणून मी विजया बँकेकडून 10 लाख रुपये आणि कोटक बँकेकडून 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. आता बँकेचे हप्ते भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. त्या सोसायटी मुदत ठेवीचे माझे पैसे व्याजासह परत देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबियांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आमच्या आत्महत्येस त्या सोसायटीचे चेअरमन शाम जाधव आणि तेथील कर्मचारीवर्ग संपूर्णपणे जबाबदार राहील, अशा आशयाचा तपशील प्रकाश पाटील यांच्या आपल्या आत्महत्येच्या चिठ्ठीत नमूद आहे. प्रकाश पाटील यांच्या स्वाक्षरीसह असणाऱ्या या चिठ्ठीत आत्महत्येच्या तयारीत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नांवे आहेत.
प्रकाश भरमा पाटील यांनी गेल्या 2013 साली अनसुरकर गल्ली येथील रिद्धी सिद्धी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुमारे 12 लाख रुपयांची रक्कम मुदत ठेवीच्या स्वरूपात जमा केली होती. सदर ठेवीची मुदत गेल्या 2018 साली समाप्त झाली आहे. प्रकाश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुदत ठेवीवरील व्याज पकडता एकूण रक्कम 19 लाख रुपयांच्या घरात जाते.
मात्र व्याजासह मुदत ठेवीची रक्कम पाटील यांना परत करण्यास गेल्या 2018 पासून चालढकल केली जात आहे. आपली मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळावी यासाठी प्रकाश पाटील यांनी वारंवार अर्ज विनंत्या केल्या आहेत. मिळालेले धनादेश आणि पैसे परत मिळावेत यासाठी झालेली बोलाचालीचे सर्व पुरावे पाटील यांनी आपल्या आत्महत्येच्या चिठ्ठी सोबत जोडले आहेत. दरम्यान त्या सोसायटीत ठेवलेले आपले पैसे परत मिळावेत यासाठी संपूर्ण पाटील कुटुंब आत्महत्येस सिद्ध झाल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.