कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर होणार की नाही? अशा संभ्रमावस्थेत असलेली सीमा भागासह महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे आराध्य देवस्थान असलेल्या असलेल्या दड्डी येथील श्री भावेश्वरी देवी यात्रा अर्थात मोहनगा यात्रेला अखेर हिरवा कंदील मिळाला असून आता ही यात्रा येत्या 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2021 रोजी होणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे दड्डी (ता.हुक्केरी) येथील श्री भावेश्वरी यात्रोत्सव यंदा होणार की नाही? याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. तथापि कोरोना निवळत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अमोल दळवी, दड्डी विभाग सल्लागार दयानंद पाटील, अण्णा कोकितकर आदींनी आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली.
तसेच श्री भावेश्वरी यात्रा अर्थात मोहनगा यात्रेला परवानगी मिळवली आहे. ही यात्रा येत्या 27 व 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी होणार आहे. जिल्हाधिकार्यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे आमदार सतीश जारकीहोळी यांनी हुक्केरी तालुका तहसीलदारांना यात्रोत्सवास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.
एकंदर आता मोहनगा यात्रा उत्सवाच्या तयारीला वेग येणार आहे. यात्रा होणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.