कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढाकाराने बेळगाव जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षकांची एकत्रित कार्यशाळा सोमवार दि 1 फेब्रुवारी रोजी बालिका आदर्श विद्यालय, टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील डॉ. नंदकुमार मोरे यांचे “मराठी विषय शिक्षकांची कर्तव्य” या विषयावर मार्गदर्शन होईल. स्नेह भोजनानंतर दुपारच्या सत्रात विविध विषयावर खुली चर्चा होणार आहे. जून महिना उजाडला की प्रत्येक विषयाच्या कार्यशाळांना सुरुवात होते. बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण खानापूर निपाणी या सर्व ठिकाणी कार्यशाळा होतात. विषयांच्या कार्यशाळा आणि मराठी विषयाची कार्यशाळा यामध्ये निश्चितच फरक आहे. मराठी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि मराठी चळवळ वाढावी, या हेतूने ही कार्यशाळा महत्त्वाची आहे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये विविध विषयावर खुली चर्चा होणार आहे. त्यासाठी कार्यशाळेस उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांनी मराठी विषयाबाबतचे आपले प्रश्न तयार करून घेऊन यावेत, जेणेकरून चर्चा करून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू होईल. त्याचबरोबर मराठी भाषेसाठी राबवत असलेल्या नवीन कल्पना सांगण्यासही ही कार्यशाळा खुली असेल.
कार्यशाळा बेळगावला होणार असल्याने तालुक्यातील शिक्षकांना प्रवासखर्च पडणार आहे. परंतु मराठी भाषेसाठी हा प्रवास खर्च ते आनंदाने सहन करतील ही अपेक्षा आहे, असे कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं यांनी कळवण्यात आले आहे.