Friday, December 20, 2024

/

चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने होणार सुरू : तूर्तास बेळगावात अंमलबजावणी नाही

 belgaum

देशातील सर्व चित्रपटगृहे 1 फेब्रुवारी 2021पासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून त्याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट सुद्धा केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे उत्तर कर्नाटक थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी स्वागत केले आहे. मात्र कांही जाचक अटी आणि नवे बिग बजेट चित्रपट उपलब्ध नसल्यामुळे तुर्तास आम्ही उद्यापासून चित्रपटगृहे 100 टक्के खुली करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

केंद्रीय सूचना व माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटद्वारे देशातील चित्रपटगृहे 100 टक्के खुली करण्यास परवानगी देण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. सिनेमागृहात कोविड -19 शी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल याची काळजी चित्रपटगृह चालकांनी घ्यावी. सरकार अधिकाधिक ऑनलाइन तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देत आहे.

चित्रपटाच्या दोन खेळांमध्ये थोडा वेळ असेल जेणेकरून चित्रपटगृहात गर्दी होणार नाही, असेही केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे

बेळगावमधील थिएटर चालक मात्र आपली चित्रपटगृहे सुरू करण्यास अद्याप तयार नाहीत. थिएटर सुरू करण्याबाबत सरकारने मार्गदर्शक प्रणाली आखून दिली आहे. त्यानुसार आलेल्या प्रेक्षकांचा मोबाईल क्रमांक घ्यावा असेही सांगितले आहे .मात्र हीच बाब थिएटर चालकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचा मोबाईल क्रमांक घेणे हे तांत्रिक दृष्ट्या कठीण आहे. त्याच्यासाठी अधिक मनुष्यबळ लागणार आहे. शिवाय प्रेक्षक आपला खरा नंबर देतील याचीही खात्री नाही, असे उत्तर कर्नाटक थिएटर संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.

सध्या बेळगावमध्ये कांही थिएटर चालकांनी आपली चित्रपटगृहे सुरू केली आहेत. त्यांना प्रेक्षक वर्ग मिळावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तथापि थिएटर पूर्णतः चालण्यासाठी उत्तम उत्तम बिगबजेट नवीन चित्रपट येणे आवश्यक आहे. या पद्धतीचे चित्रपट येतील तेंव्हाच प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभेल, असेही अविनाश पोतदार यांनी स्पष्ट केले. मात्र परिस्थिती पूर्वीपेक्षा बर्‍यापैकी नियंत्रणात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.