भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी गणेशपूर येथील नियोजित रेडक्रॉस शताब्दी इमारतीच्या ठिकाणी भेट घेऊन इमारत बांधकामाच्या प्रगतीची पाहणी केली.
गणेशपूर येथील निजलींगप्पा शुगर इन्स्टिट्यूटशेजारी भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव शाखेची स्वतःची इमारत उभारण्यात येत आहे. निर्मिती केंद्र बेळगावने हाती घेतलेल्या या इमारतीच्या बांधकामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या नियोजित इमारतीमध्ये रेडक्रॉस कार्यालय, वर्कशॉप, प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्र, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आरोग्याशी निगडित वैद्यकीय कक्ष असणार आहेत.
सदर भेटीप्रसंगी रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्ह्यातील मानवता सेवेबद्दल जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी प्रशंसोद्गार काढले. त्याप्रमाणे रेड क्रॉस सोसायटीच्या या इमारतीसाठी आणि त्यांच्या उपक्रमांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण संस्था आणि लोकप्रतिनिधींकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
याप्रसंगी भारतीय रेडक्रॉस सोसायटी बेळगावचे चेअरमन अशोक बदामी, सेक्रेटरी डॉ. डी. एन. मिसाळ, खजिनदार विनोदिनी शर्मा, जी. शिवयोगीमठ, विकास कलघटगी, एस. एन. मुळीमनी, सुप्रिया पुराणिक, प्रा. कोळुचे, डॉ. अमित चिंगळे आदींसह निर्मिती केंद्राचे संचालक उपस्थित होते.